पाकिस्तानच्या फकर झमाननं विराटचं रेकॉर्ड मोडलं

पाकिस्तानचा क्रिकेटपटू फकर झमाननं वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद एक हजार रन करण्याचा विक्रम केला आहे.

Updated: Jul 22, 2018, 04:59 PM IST
पाकिस्तानच्या फकर झमाननं विराटचं रेकॉर्ड मोडलं  title=

बुलावायो : पाकिस्तानचा क्रिकेटपटू फकर झमाननं वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद एक हजार रन करण्याचा विक्रम केला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये फकर झमाननं या विक्रमाला गवसणी घातली. २८ वर्षांच्या फकर झमाननं १८ इनिंगमध्ये एक हजार रनचा टप्पा ओलांडला. याआधी ५ खेळाडूंनी २१ इनिंगमध्ये एक हजार रन केल्या होत्या. व्हिव्हियन रिचर्ड्स, केविन पिटरसन, जॉनथन ट्रॉट, बाबर आझम आणि क्विंटन डीकॉकनं २१ इनिंगमध्ये एक हजार रन केल्या होत्या. भारताचा कर्णधार विराट कोहलीला हे रेकॉर्ड करण्यासाठी २४ इनिंग लागल्या होत्या.

मागच्या २ वर्षांमध्ये फकर झमाननं पाकिस्तानसाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. १८ इनिंगमध्ये झमाननं ३ अर्धशतकं आणि ५ शतकं झळकावली आहेत. मागच्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये झमाननं १०६ बॉलमध्ये ११४ रनची खेळी केली होती. या मॅचमध्ये पाकिस्ताननं भारताला हरवत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये झमानं ८५ रनवर आऊट झाला. या सीरिजमध्ये झमाननं ५०५ रन केल्या. ५ वनडे मॅचच्या सीरिजमधली ही एका खेळाडूची सर्वाधिक धावसंख्या आहे. याआधी झिम्बाब्वेच्या हॅमिल्टन मसकादझाच्या नावावर हे रेकॉर्ड होतं. मसकादझानं ५ मॅचच्या सीरिजमध्ये ४६७ रन केल्या होत्या.

या आठवड्याच्या सुरुवातीला फकर झमाननं वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावलं. वनडेमध्ये द्विशतक झळकावणारा झमान हा पहिला पाकिस्तानी क्रिकेटपटू ठरला. झमाननं या मॅचमध्ये नाबाद २१० रनची खेळी केली. याआधी पाकिस्तानकडून सईद अन्वरच्या नावावर हे रेकॉर्ड होतं. अन्वरनं वनडेमध्ये १९४ रन केल्या होत्या.

याचबरोबर फकर झमाननं इमाम उल हकसोबत ३०४ रनची ओपनिंग पार्टनरशीप केली. वनडे क्रिकेटमधली ही सर्वात मोठी ओपनिंग पार्टनरशीप आहे. याआधी श्रीलंकेच्या सनथ जयसूर्या आणि उपूल थरंगानं २००६ साली इंग्लंडविरुद्ध २८६ रनची ओपनिंग पार्टनरशीप केली होती.