मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला त्याच्या शांतपणाबद्दल ओळखलं जातं. मैदानातल्या आणि मैदानाबाहेरच्या त्याच्या याच वागणुकीमुळे त्याला कॅप्टन कूल असंही बोललं जातं. धोनीच्या याच शांत स्वभावामुळे भारताला टी-२० वर्ल्ड कप, २०११ वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूंना आई-बहिणीवरून शिव्या द्यायच्या नाहीत अशी तंबीच धोनीनं त्याच्या खेळाडूंना दिली होती. तुम्ही अशा शिव्या दिल्यात तर त्यामुळे खेळाडूंच्या आई आणि बहिणीलाही याचा त्रास होईल, असं धोनी म्हणाला होता. प्रतिस्पर्धी टीमला मानसिकदृष्ट्या नामोहरम करायचं असेल तर तुमच्या स्टाईलनं करा. शिवी देऊन करू नका असं धोनीनं खेळाडूंना सांगितलं होतं.
'द धोनी टच' या नव्या पुस्तकामध्ये धोनीबद्दलचे असे अनेक किस्से सांगण्यात आले आहेत. २००८ सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातला एक किस्साही या पुस्तकात लिहिण्यात आलाय. २००८ साली मेलर्बन क्रिकेट ग्राऊंडवर भारतानं ऑस्ट्रेलियाला १५९ रनवर ऑल आऊट केलं होतं. भारत ही मॅच जिंकण्याचा जवळ होता. पण धोनीनं विजयानंतर कोणतंही सेलिब्रेशन करू नका असं सांगितलं. या मॅचमध्ये भारतानं सेलिब्रेशन केलं तर ते ऑस्ट्रेलियाला डिवचल्यासारखं होईल आणि पुढच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया बदला घेण्यासाठी मैदानात उतरेल. पण आपण सेलिब्रेशन केलं नाही तर हा मोठा उलटफेर नाही तर यापुढेही आम्ही तुम्हाला हरवू असा संदेश ऑस्ट्रेलियाच्या टीमला जाईल, असं धोनीला वाटत होतं.
त्यावेळी रिकी पॉटिंगच्या नेतृत्वात खेळणारी ऑस्ट्रेलियाची टीम आक्रमकतेसाठी प्रसिद्ध होती. त्यामुळेच धोनीनं खेळाडूंना हा सल्ला दिला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही सीरिज भारत जिंकला होता.