पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? पीसीबी अध्यक्ष झका अश्रफ यांचा तडकाफडकी राजीनामा

PCB Chairman Zaka Ashraf Resignation: दोन दिवसांपूर्वी मिकी आर्थरसह सपोर्ट स्टाफच्या तीन सदस्यांनी राजीनामा दिला होता. अशातच झका अश्रफ यांनी अवघ्या 6 महिन्यांत अध्यक्षपदाला रामराम ठोकलाय. 

सौरभ तळेकर | Updated: Jan 20, 2024, 08:39 PM IST
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? पीसीबी अध्यक्ष झका अश्रफ यांचा तडकाफडकी राजीनामा title=
Pakistan Cricket Board, Zaka Ashraf Resignation

PCB President Resignation: भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये झालेल्या दारूण पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) साडेसाती लागल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्तानचा नियमित कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने राजीनामा दिला अन् पाकिस्तानला क्रिकेटला वाळवी लागली. अशातच आता पीसीबीला दोन मोठे धक्के बसले आहेत. दोन दिवसापूर्वी पाकिस्तानचे हेड कोच मिकी ऑर्थर (Mickey Arthur) यांनी पाकिस्तान संघाच्या हेडकोच पदाचा राजीनामा दिला होता. अशातच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झका अश्रफ (PCB Chairman Zaka Ashraf) यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडे राजीनामा सोपवला आहे. त्यामुळे आता क्रिडाविश्वात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

दोन दिवसांपूर्वी मिकी आर्थरसह सपोर्ट स्टाफच्या तीन सदस्यांनी राजीनामा दिला होता. अशातच झका अश्रफ यांनी अवघ्या 6 महिन्यांत अध्यक्षपदाला रामराम ठोकलाय. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटचं काय होणार? असा सवाल विचारला जातोय. झका अश्रफ यांना पाकिस्तानमध्ये सरकार बदलल्यानंतर नजम सेठी यांच्या जागी बोर्डाचे अध्यक्ष बनवण्यात आलं होतं. मात्र, आता त्यांनी पीसीबीला अलविदा केलाय. एवढंच नाही तर पीसीबीने व्यवस्थापन समितीच्या प्रमुखपदी राहण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती.

PCB च्या निवेदनात काय म्हटलंय?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या बैठकीच्या शेवटी, झका अश्रफ यांनी जाहीर केलं की त्यांनी एमसीच्या अध्यक्ष आणि सदस्यपदाचा राजीनामा माननीय संरक्षक कार्यवाहक पंतप्रधान अन्वर-उल-हक कक्कर यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. 

दरम्यान,  झका अश्रफ हे पदवीधर नसल्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाय का? असा सवाल पाकिस्तानमध्ये विचारला जातोय. त्यांची शैक्षणिक पात्रता कमी असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. झका अश्रफ यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिलाय. भारत पाकिस्तान मॅच दरम्यान पाक क्रिकेटपटूंच्या पत्नी कोणाची हेरगिरी करायच्या? असा सवाल त्यांनी उपस्थित करून खळबळ उडवून दिली होती. 2012 मध्ये पाकिस्तान टीम भारत दौऱ्यावर आली होती. त्यावेळी हेरगिरीसाठी क्रिकेटपटूंसोबत त्यांच्या पत्नीलाही पाठवण्यात आलं होतं, असा आरोप देखील त्यांनी केला होता.