कपिल देव, गायकवाड आणि रंगास्वामींची समिती ठरवणार महिला टीमचा प्रशिक्षक

बीसीसीआयनं मंगळवारी महिला क्रिकेट टीमच्या प्रशिक्षक निवडीसाठी एका समितीची स्थापना केली आहे.

Updated: Dec 11, 2018, 08:25 PM IST
कपिल देव, गायकवाड आणि रंगास्वामींची समिती ठरवणार महिला टीमचा प्रशिक्षक title=

मुंबई : बीसीसीआयनं मंगळवारी महिला क्रिकेट टीमच्या प्रशिक्षक निवडीसाठी एका समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये माजी क्रिकेटपटू कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि रंगास्वामी यांचा समावेश करण्यात आला आहे. महिला क्रिकेट टीमचा प्रशिक्षक होण्यासाठी अनेक इच्छुकांनी अर्ज केले आहेत. या इच्छुकांची मुलाखत कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि रंगास्वामी यांची समिती २० डिसेंबरला मुंबईमध्ये घेईल.

भारताच्या पुरुषांच्या टीमसाठीच्या प्रशिक्षकांची निवड सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुलीची समिती करते. पण महिला टीमच्या प्रशिक्षकांची निवड करायला या तिघांच्या समितीनं नकार दिला होता. म्हणून बीसीसीआयनं नव्या समितीची नियुक्ती केली आहे.

भारतीय महिला टीमचे प्रशिक्षक रमेश पोवार यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबरला संपला होता. यानंतर बीसीसीआयनं महिला टीमच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवायला सुरुवात केली. यासाठी प्रभाकर आणि हर्षल गिब्स यांनीही अर्ज भरले आहेत.

रमेश पोवारचा वादग्रस्त कार्यकाळ

नुकत्याच झालेल्या टी-२० वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडनं भारताला पराभूत केलं. या मॅचमध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरनं फॉर्ममध्ये असलेल्या मिताली राजला टीममधून वगळलं होतं. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. मिताली राज आणि रमेश पोवार यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते.

रमेश पोवारच्या बचावासाठी कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना आल्या होत्या. रमेश पोवार यांना प्रशिक्षक म्हणून कायम ठेवण्यासाठी या दोघींनी बीसीसीआयला पत्र लिहीलं होतं. पण हा वाद वाढल्यामुळे बीसीसीआयनं पोवार यांचा कार्यकाळ वाढवण्याऐवजी नवीन प्रशिक्षकाच्या निवडीसाठी अर्ज मागवायला सुरुवात केली. भारतीय महिला टीमचा प्रशिक्षक होण्यासाठी मनोज प्रभाकर, हर्षल गिब्ज आणि दिमित्री मास्करेनस या खेळाडूंनी अर्ज केले आहेत. १४ डिसेंबर ही अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. 

रमेश पोवार यांचं पुनरागमन नाही

रमेश पोवार यांचं प्रशिक्षक म्हणून पुनरागमन होणार नाही, हे आता बीसीसीआयनं नवीन समितीची घोषणा केल्यामुळे निश्चित झालं आहे. नवीन प्रशिक्षक निवडीची प्रक्रिया रद्द करावी आणि रमेश पोवार यांना कमीतकमी पुढच्या महिन्यात सुरु होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यापर्यंत प्रशिक्षक ठेवावं, अशी मागणी प्रशासकीय समितीतल्या डायना एडुलजी यांनी केली होती. पण प्रशासकिय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे आता रमेश पोवार यांचं प्रशिक्षक म्हणून पुनरागमन होणार नाही हे निश्चित झालं आहे.