VIDEO : ...जेव्हा केदार जाधवला धोनी म्हणतो, 'भाऊsss घेऊन टाक!'

मास्तर धोनी चक्क मराठीतून मार्गदर्शन करतो तेव्हा.... 

Updated: Feb 4, 2019, 10:01 AM IST
VIDEO : ...जेव्हा केदार जाधवला धोनी म्हणतो, 'भाऊsss घेऊन टाक!'   title=

वेलिंग्टन: न्यूझीलंडमध्ये रविवारी खेळल्या गेलेल्या पाचव्या एकदिवसी सामन्यात भारतीय संघाने यजमान न्यूझीलंड संघाला नमवलं. पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका ४-१ अशा फरकाने जिंकत भारतीय क्रिकेट संघाने आणखी एका मालिकेत विजयी पताका उंचावली. हा पाचवा एकदिवसीय सामना बऱ्याच कारणांनी चर्चेत राहिला. हार्दिक पांड्याच्या वेगवान ४५ धावा असो, त्याची गोलंदाजी असो किंवा मग अंबाती रायडूची ९० धावांनी महत्त्वपूर्ण खेळी असो. या साऱ्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजीला विसरुनही चालणार नाही. 

क्रीडारसिकांची उत्कंठा वाढवणाऱ्या या सामन्याविषयी होणाऱ्या चर्चांमध्ये आता आणखी एका विषयाने लक्ष वेधलं आहे. ही चर्चा होतेय यष्टीरक्षणासाठी उभ्या असणाऱ्या महेंद्रसिंह धोनीची आणि त्याच्या मार्गदर्शन करण्याच्या अनोख्या शैलीची. भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघालाही फलंदाजीमध्ये विशेष कामगिरी बजावता आली नाही. न्यूझीलंडची फलंदाजी सुरु असताना ३९व्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या केदार जाधव या मराठमोळ्या खेळाडूला विरोधी संघाच्या खेळाडूसाठी कशा प्रकारचा चेंडू टाकायचा याविषयीचं मार्गदर्शन करण्यासाठी धोनीने चक्क मराठी भाषेचा वापर केला. 

सोशल मीडियावर सध्या धोनीचा हा मराठमोळा अंदाज अनेकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. केदार गोलंदाजी करत असताना 'पुढे नकोsss भाऊ.... घेऊन टाक!', असं स्टंपच्या आडून धोनी केदारला सांगताना ऐकू येत आहे. स्टंप माईकमध्ये टीपलेला धोनीचा आवाज आणि त्याचा अंदाज पाहता खेळाडूंच्या कलानं घेत कशा प्रकारे त्यांना प्रेरणा देत सर्वोत्त खेळाचं प्रदर्शन त्यांच्याकडून करुन घ्यायचं ही कला धोनीला चांगलीच अवगत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.