मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या पुढील हंगामासाठी हार्दिक पांड्याची कर्णधारपदी निवड केली आहे. यासह रोहित शर्माची कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्समधील कारकिर्द संपुष्टात आली आहे. रोहित शर्माने सलग 10 सीझनमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं आहे. यामधील 5 वेळा त्याने संघाला विजेतेपद मिळवून दिलं असून, आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांच्या यादीत आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून 15 कोटींमध्ये ट्रेड केलं होतं. तेव्हापासूनच हार्दिक पांड्याकडे संघाचं नेतृत्व सोपवलं जाईल असे अंदाज वर्तवले जात होते.
दरम्यान रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवणं मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना फारसं रुचलेलं नाही. तर काहींनी हार्दिक पांड्याऐवजी बुमरहाकडे कर्णधारपद सोपवायला हवं होतं अशी मागणी केली आहे. रोहित शर्माला कर्णधारपद न देण्याचा निर्णय अनेकांच्या भुवया उंचावत असतानाच मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक महेला जयवर्धने याने या निर्णयावर भाष्य केलं आहे.
To new beginnings. Good luck, #CaptainPandya pic.twitter.com/qRH9ABz1PY
— Mumbai Indians (@mipaltan) December 15, 2023
"हा एक वारसा निर्माण करण्याचा आणि मुंबई इंडियन्सचा भविष्यासाठी तयार राहण्याच्या तत्वज्ञानाचा भाग आहे. मुंबई इंडियन्सला सचिनपासून ते हरभजनपर्यंत आणि रिकी पाँटिंगपासून ते रोहितपर्यंत नेहमीच अपवादात्मक नेतृत्व लाभलं आहे. यांनी संघाच्या यशात मोलाचं योगदान देताना भविष्यासाठी संघ मजबूत करण्यावरही लक्ष केंद्रीत केलं होतं. आमच्या याच परंपरेचा भाग म्हणून आयपीएल 2024 साठी हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद भूषवेल," असं महेला जयवर्धेनेने म्हटलं आहे.
"आपल्या अपवादात्मक नेतृत्वासाठी आम्ही रोहित शर्माचे आभार मानतो. 2013 पासूनचा मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून त्याचा कार्यकाळ जबरदस्त राहिला आहे. त्याच्या नेतृत्वाने संघाल फक्त अतुलनीय यश मिळवून दिलं नाही, तर आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक म्हणून आपलं स्थान निश्चित केलं," असं महेला जयवर्धेने म्हणाला आहे.
रोहित शर्मा कर्णधारदावरुन हटल्याने मुंबई इंडियन्सची गेल्या दशकापासूनचं नेतृत्व मागे सरलं आहे. रोहित शर्माने तब्बल 10 वर्षं मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं. त्यात त्याने 5 वेळा संघाला आयपीएल जिंकून दिला. रोहित शर्माच्या या कामगिरीची बरोबरी करणं फक्त महेंद्रसिंग धोनीला शक्य झालं आहे. धोनीने तब्बल 12 वर्षं संघाचं नेतृत्व केलं आहे.
दरम्यान रोहित शर्मा टी-20 वर्ल्डकपवर लक्ष केंद्रीत करणार असल्याने कर्णधारदावरुन बाजूला झाल्याचीही चर्चा आहे. आयपीएलनंतर लगेचच जून महिन्यात हा वर्ल्डकप होणार आहे. रोहित शर्माने अद्याप यासंदर्भात अधिकृतपणे काही जाहीर केलेलं नाही. पण दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेत तो न खेळणं अनेक गोष्टी स्पष्ट करत आहे.
रिपोर्टनुसा, BCCI ने रोहित शर्माला T20 विश्वचषक 2024 मध्ये भारताचे नेतृत्व करण्यास सांगितलं आहे. परंतु अद्याप त्याने काही स्पष्ट सांगितलेलं नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत या गोष्टी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत, कर्णधाराच्या भूमिकेसाठी केएल राहुल आणि हार्दिक पंड्या हे दोन सर्वात आश्वासक उमेदवार आहे. अलीकडेच सूर्यकुमार यादवनेही टी-20 मध्ये आपण उत्कृष्ट नेतृत्व करु शकतो हे दाखवून दिलं आहे.