मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्रात चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत 4 सामने गमवले आहेत. अनुभवी खेळाडूंनी सुशोभित अशी ही टीम आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कोलकाता नाईट रायडर्सने 10 धावांनी पराभव केला. या सामन्यात धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता परंतु पुन्हा एकदा काही खास कामगिरी करू शकला नाही. पण यानंतरही धोनीने या सामन्यात इतिहास रचला आहे.
धोनीने विकेटच्या मागे अप्रतिम कामगिरी केली आणि आता महेंद्रसिंग धोनी आयपीएलमध्ये सर्वाधिक कॅच पकडणारा विकेटकीपर बनला आहे. त्याने दिनेश कार्तिकला मागे टाकले आहे.
आयपीएलमध्ये धोनीने सर्वाधिक 104 कॅच पकडले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात धोनीने दिनेश कार्तिकचा विक्रम मोडला. यापूर्वी आयपीएलमध्ये सर्वाधिक कॅच पकडण्याचा विक्रम विकेटकीपर दिनेश कार्तिकच्या नावावर होता. दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये आतापर्यंत 103 कॅच पकडले आहेत.
आयपीएलमध्ये 100 हून अधिक कॅच पकडणारे धोनी आणि कार्तिक हे दोनच विकेटकीपर आहेत. कोलकाता नाईट रायडर्सने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 167 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने चमकदार सुरुवात केली पण शेवटी धावांचा वेग कमी झाल्यानंतर चेन्नईला 10 रनने पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 5 गडी गमावून 157 धावा केल्या.