वर्ल्डकपमध्ये भारतीय जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी भलत्याच फॉर्ममध्ये आहे. वर्ल्डकपमध्ये त्याने आतापर्यंत 23 विकेट्स घेतले आहेत. एकीकडे मैदानावर मोहम्मद शमी आपल्या गोलंदाजीने वादळ निर्माण करत असताना दुसरीकडे पत्नी हसीन जहाँ त्याच्यावर वेगवेगळी भाष्य करताना दिसत आहे. तो जितका चांगला खेळाडू आहे, तितकाच चांगला पती आणि पिता असता तर बरं झालं असतं असं तिने म्हटलं आहे. पत्नी हसीन जहाँने कौटुंबिक हिसाचार आणि विवाहबाह्य संबंधांचा आरोप केल्याने मोहम्मद शमी तिच्यापासून वेगळा झाला होता.
"तो जितका चांगला खेळाडू आहे तितकाच चांगला माणूसही असता तर आमचं आयुष्य फार चांगलं असतं. जर तो एक चांगली व्यक्ती असता तर माझी मुलगी, माझा पती आणि मी एक सुखी आयुष्य जगलो असतो. तो केवळ एक चांगला खेळाडू नसून एक चांगला नवरा आणि एक चांगला पिताही असता तर ती अधिक आदराची आणि सन्मानाची बाब असती," असं हसीन जहाँ म्हणाली आहे.
पुढे ती म्हणाली की, "पण शमीच्या चुकांमुळे, लोभामुळे आणि त्याच्या घाणेरड्या मनामुळे आम्हा तिघांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहे. मात्र, तो पैशाच्या माध्यमातून आपली नकारात्मक बाजू लपवण्याचा प्रयत्न करत आहे".
दरम्यान मोहम्मद शमीने न्यूझीलंडविरोधातील सामन्यात 7 विकेट घेत रेकॉर्ड मोडल्याबद्दल काय वाटतं असंही हसीन जहाँला विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना ती म्हणाली की, "मला काहीच विशेष वाटत नाही. पण भारतीय संघाने सेमी-फायनल जिंकली याचा आनंद आहे. भारतीय संघाने फायनलही जिंकावी अशी माझी प्रार्थना आहे".
मोहम्मद शमीला अभिनयातून राजकारणात गेलेल्या पायल घोषने लग्नाचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर तिने म्हटलं की, "सेलिब्रिटींसह अशा गोष्टी होत असतात. ही सामान्य बाब आहे. मला त्यावर काही बोलायचं नाही".
हसीन जहाँने पोलीस तक्रार केल्यापासून तिच्यात आणि मोहम्मद शमी यांच्यात कायदेशीर लढा सुरु आहे. मोहम्मद शमीने कौटुंबिक हिसाचार केल्याचा तसंच विवाहबाह्य संबंध असल्याचा हसीन जहाँचा आरोप आहे. यानंतर शमीवर कौटुंबिक अत्याचार आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप लावण्यात आला होता.
हसीन जहाँने आरोप केला आहे की, मोहम्मद शमी आणि त्याच्या कुटुंबाने आपण जेव्हा कधी उत्तर प्रदेशच्या घरी गेलो तेव्हा अत्याचार केला. पण मोहम्मद शमीने नेहमीच हे आरोप फेटाळून लावले आहेत. आपली बदनामी करण्याचा हा कट असल्याचं त्याने सांगितलं आहे. सप्टेंबरमध्ये विश्वचषक सुरू होण्यापूर्वी शमी कोलकाता येथील स्थानिक न्यायालयात हजर झाला होता. यावेळी त्याला हसीन जहाँने 2018 मध्ये दाखल केलेल्या घरगुती हिंसाचार प्रकरणात जामीन मिळाला होता.