भारतीय संघातील तुझे दोन बेस्ट फ्रेंड कोण? मोहम्मद शमीने केला खुलासा; विशेष म्हणजे ते बुमराह, सिराज नाहीत

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये (ODI World Cup) भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) जबरदस्त कामगिरी केली होती.   

शिवराज यादव | Updated: Jul 21, 2024, 06:15 PM IST
भारतीय संघातील तुझे दोन बेस्ट फ्रेंड कोण? मोहम्मद शमीने केला खुलासा; विशेष म्हणजे ते बुमराह, सिराज नाहीत title=

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये (ODI World Cup) भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) जबरदस्त कामगिरी केली होती. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने एकदिवसीय वर्ल्डकपची फायनल गाठली होती. मात्र अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न धुळीस मिळवलं. मोहम्मद शमीने वर्ल्डकपमधील 7 सामने खेळले होते. या 7 सामन्यात त्याने 24 विकेट्स घेतले आणि सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला. वर्ल्डकपदरम्यान मोहम्मद शमीच्या घोट्याला दुखापत झाली होती. यानंतर तो क्रिकेटमधून काही काळासाठी बाहेर होता. मात्र आता तो पुन्हा एकदा नेटमध्ये परतला असून, गोलंदाजीचा सराव करत आहे. 

दुखापतीनंतर आणि आयपीएल तसंच टी-20 वर्ल्डकपला मुकल्यानंतरही मोहम्मद शमी चांगल्या स्थितीत दिसती आहे. नुकतंच मोहम्मद शमीने एका पॉडकास्टला हजेरी लावली. यावेळी त्याने विराट कोहली आणि इशांत शर्मा हे भारतीय संघातील आपले दोन चांगले मित्र असल्याचा खुलासा केला. 

"विराट कोहली आणि इशांत शर्मा माझे बेस्ट फ्रेंड आहेत. मी जखमी असताना ते मला सतत फोन करत होते," असं मोहम्मद शमीने शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं.

मोहम्मद शमीने यावेळी पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंझमाम उल-हकवर जोरदार टीका केली. इंझमाम उल-हकने टी-20 वर्ल्डकपदरम्यान अर्शदीप सिंगने चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे एकदिवसीय वर्ल्डकपदरम्यान मोहम्मद शमीवरही असा आरोप झाला होता. पाकिस्तानचा माजी खेळाडू हसन रझा म्हणाला होता की, भारताला वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू मिळत होते, त्यात उपकरण बसवले होते आणि त्यामुळेच शमीला अतिरिक्त स्विंग मिळत होते.

"मी एका मुलाखतीत सांगितले आहे की, मी बॉल कापून त्यात एखादं उपकरण आहे की नाही हे दाखवेन. आता आणखी एक नमुना आला आहे. तो म्हणतो, 'अर्शदीप सिंगला रिव्हर्स स्विंग कसा मिळेल?' मला इंझमाम भाईंना एकच सांगायचे आहे, जर तुम्ही असंच करत असाल तर त्यांच्याविरुद्ध जे चांगले काम करतात, ते त्यांचे लक्ष्य असतील. भारत आणि पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्धी आहे," असं शमी म्हणाला.

"माजी खेळाडू असूनही तुम्ही असे बोलू शकता, अशी मला अपेक्षा नाही. वसिम अक्रमनेही पंच तुम्हाला चेंडू कसा देतात आणि त्यात कोणतेही उपकरण लावणं शक्य नाही, असं सांगितलं. कार्टूनगिरी हा प्रकार चांगला नाही. ही विधाने लोकांना मुर्ख बनवायला आहेत," अशी टीका शमीने केली.