Mohammed Shami Humble: 2023 च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत मोहम्मद शमीचे वेगळे रुप देशासह जगाने पाहिले. त्याच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाच्या फायनलपर्यत सहज पोहोचू शकला. सुरुवातीचे काही सामने बाहेर बसावे लागल्यानंतर मोहम्मद शमीने सिलेक्टर्सना आपली दखल घ्यायला भाग पाडले. त्याने इतका चांगला खेळ केला की क्रिकेट विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होण्यास त्याला कोणी रोखू शकले नाही. फिस्कटलेल्या संसारामुळे मोहम्मद शमी काहीकाळ बॅकफूटवर गेला होता. पण त्याने करिअरवरील फोकस ढळू दिला नाही. शमी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात खूप प्रेमळ असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. तो सर्वांना नेहमी मदत करत असतो. तसेच चाहत्यांना कधीच नाराज करत नाही. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून हे केवळ मोहम्मद शमीच करु शकतो असे तुम्हीदेखील म्हणाल. वन डे वर्ल्डकप स्पर्धेत सात सामन्यांत 24 बळी घेऊन गोलंदाजीत अव्वल स्थान मिळवणारा मोहम्मद शमी हा टीम इंडियाचा हुकुमाचा एक्का बनलाय. क्रिकेट वर्ल्ड कपनंतर त्याची लोकप्रियता वाढली आहे.
मोहम्मद शमीने उत्तर प्रदेशमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर तो भारतीय क्रिकेट संघात येण्यापूर्वी बंगालकडून राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट खेळला. मोहम्मद शमीने अलीकडेच त्याच्या छंदांबद्दल आणि त्याच्या करिअरबद्दल खुलासा केला. "मला प्रवास करायला, मासेमारी करायला गाडी, बाईक आणि कार चालवायला आवडते. पण भारतासाठी खेळल्यानंतर मी बाईक चालवणे बंद केल्याचे शमी सांगतो. मला दुखापत झाली तर? अशी भीती सतावते. पण मी माझ्या आईला भेटायला जाण्यासाठी बाईकवरुन प्रवास करतो, असेही तो सांगतो.
मी तळातून आलोय, शेतात काम केले आहे. ट्रॅक्टर, बस, ट्रक चालवले आहेत, असे शमी सांगतो. माझ्या एका शाळेतील मित्राच्या घरी ट्रक होता. त्याने मला चालवायला सांगितले. तेव्हा मी लहान होतो आणि जमिनीवर गाडी चालवत गोलो आणि ट्रॅक्टर तलावात नेला. त्यावेळी माझ्या वडिलांनी मला शिव्या दिल्याची आठवण शमी सांगतो.
मोहम्मद शमी आता त्याच्या गावी खूप लोकप्रिय व्यक्ती बनला आहे. त्याचे शेकडो चाहते त्याच्या फार्म हाऊसवर येत असतात. शमीसोबत सेल्फी मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. दररोज शेकोडो लोक शमीच्या फार्महाऊस बाहेर रांग लावताना दिसतात. पण शमी कोणाला कधीच नाराज करत नाही. मोहम्मद शमीने अलीकडे एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. माणसांची गर्दी इतकी वाढली की सुरक्षा रक्षकांना पाचारण करावे लागले.