रोहित शर्मा जाड दिसतो, विराट कोहलीपेक्षा जास्त...; भारतीय संघाच्या प्रशिक्षकाचं मोठं विधान

विराट कोहलीला क्रिकेट जगतातील सर्वात फिट क्रिकेटपटू म्हणून ओळखलं जातं. तर दुसरीकडे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला त्याच्या वजनावरुन नेहमीच ट्रोल केलं जात. यादरम्यान बीसीसीआयचे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच अंकित कलियार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 11, 2023, 12:38 PM IST
रोहित शर्मा जाड दिसतो, विराट कोहलीपेक्षा जास्त...; भारतीय संघाच्या प्रशिक्षकाचं मोठं विधान title=

क्रिकेट असो किंवा इतर कोणताही खेळ असो, एखाद्या खेळाडूला जर आव्हानांचा सामना करत यशस्वी व्हायचं असेल तर फिटनेस सर्वात महत्त्वाचा असतो. क्रिकेटमध्ये तर खेळाडूसाठी फक्त फिटनेस महत्त्वाचा नसून, तिन्ही प्रकारात खेळण्यासाठी आपलं शरीर साथ देईल अशी शिस्त लावणंही महत्त्वाचं आहे. तुम्ही सतत चांगली कामगिरी करण्यासाठी, शारिरीकरित्या तंदरुस्त राहणं गरजेचं असतं. बीसीसीआयचे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच अंकित कलियार यांनी भारतीय संघात आत्मविश्वास निर्माण करण्याचं श्रेय विराट कोहलीला दिलं आहे. अंकित कलियार हे माजी राज्यस्तरीय क्रिकेटरही आहेत. 

अंकित कलियार यांनी अनेक रणजी संघ तसंच मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, मोहित शर्मा आणि इतर खेळाडूंसोबत काम केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अंकित यांनी विराटचा जबरदस्त फिटनेस, यो-यो चाचणीचं महत्त्व आणि विराटच्या पावलांवर पाऊल टाकणारा शुभमन गिल अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. 

अंकित कलियार यांनी भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक खेळाडूंसोबत काम केलं आहे. दिल्ली, युपीसीए आणि उत्तराखंडे क्रिकेट असोसिएशनसोबतही ते जोडले गेले होते. याशिवाय अनेक स्थानिक, राष्ट्रीय आणि आयपीएलमधील क्रिकेटर्ससोबतही त्यांनी प्रशिक्षण दिलं आहे. याशिवाय मोहन वोहरा, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, मोहित शर्मा आणि इतर खेळाडूंसोबत त्यांनी काम केलं आहे. 

सध्याच्या भारतीय संघात शारिरीकदृष्ट्या सर्वात फिट क्रिकेटर कोण आहे? असं विचारण्यात आलं असता, त्यांनी विराट कोहली उत्तर दिलं. विराट कोहली खेळत असला किंवा नसला तरी आपलं वेळापत्रक पाळतो. तो नेहमीच पोषण, प्रशिक्षण आणि कंडिशनिंग या सगळ्यांची काळजी घेत असतो. तो कधीच आपलं वेळापत्रक मोडत नाही. तो फक्त भारत नाही तर जगातील सर्व फिट खेळाडू आहे असं ते म्हणाले आहेत. 

यो-यो चाचणीबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, जेव्हा एखादा फलंदाज चेंडू टोलावतो तेव्हा खेळाडू किती वेळात त्या चेंडूच्या मागे धावून अडवत पुन्हा मागे सोपवतो. किंवा चेंडू टोलवल्यानंतर फलंदाज किती धावा पळून काढतो या गोष्टी महत्त्वाच्या असता. या चाचणीत काही पॅरामीटर्स आहेत. 17 आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळणारे यात उत्तीर्ण होतात. त्यामुळे या चाचणीत खेळाडू संघाचा भाग होण्यासाठी फिट आहे की, नाही याचा निर्णय घेतला जातो. 

दरम्यान अंकित कलियार यांनी विराट कोहलीचं कौतुक करताना त्याने संघात फिटनेसची परंपरा आणल्याचं म्हटलं आहे. त्याने सर्वांसमोर एक उदाहरण ठेवलं असून, कर्णधार असताना सर्वजण फिट राहतील याची काळजी घेतल्याचं त्यांनी सांगितलं. त्याने संघात शिस्त आणल्याचं कौतुक त्यांनी केलं. 

यावेळी त्यांना रोहित शर्माच्या फिटनेसबद्दल विचारण्यात आलं असता म्हणाले, रोहित शर्मा फिट खेळाडू आहे. त्याचा फिटनेस चांगला आहे. तो थोडा जाड दिसतो, पण नेहमीच यो-यो चाचणीत उत्तीर्ण होतो. तो विराट कोहलीइतकाच फिट आहे. तो दिसताना जाड वाटतो, पण आपण त्याला मैदानात पाहिलं आहे. त्याची चपळता आणि गतिशीलता अप्रतिम आहे. तो फिट क्रिकेटर्सपैकी आहे.