चंद्रपुरातील वनक्षेत्र घटलं,सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!

Chandrapur Fores Area: भारत देशात वनक्षेत्रात वाढ झाली असताना चंद्रपूर जिल्ह्यातील वनक्षेत्रामध्ये घट झालीये.

Pravin Dabholkar | Updated: Dec 29, 2024, 08:37 PM IST
चंद्रपुरातील वनक्षेत्र घटलं,सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर! title=
चंद्रपूर वनक्षेत्र

Chandrapur Fores Area: शासन नियमाप्रमाणे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक आहे. परंतू वन विभागानं केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आलीये. चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट वनक्षेत्र दोन टक्क्यांनी कमी झाल्याचं वास्तव समोर आलंय.

वन सर्वेक्षण विभागानं 2023 ची भारतातील वनक्षेत्रांचे प्रमाण आणि स्थिती दर्शवणारी आकडेवारी जाहीर केलीये. यामध्ये भारतात एकूण भूभागाच्या 25.17 टक्के क्षेत्रात जंगल आहे तर महाराष्ट्रात हे प्रमाण 16.94 टक्क्यांवर आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट वनक्षेत्र दोन टक्क्यांनी कमी झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय.. 

2021 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 35.40 टक्के जंगल होते. 2023 च्या आकडेवारीनुसार हे प्रमाण 35.21 टक्क्यांवर आलंय. 2021 मध्ये घनदाट जंगल 1320.89 वर्ग किमी होते. 2023 मध्ये ते कमी होऊन 1318.87 वर्ग किमी झाले. 2021 मध्ये मध्यम घनदाट जंगल 1555.39 वर्ग किमी होते.

2023 च्या आकडेवारीनुसार 1521.60 वर्ग किमी झालंय.2021 मध्ये उघडे वनक्षेत्र 1173.99 वर्ग किमी होते. 2023 च्या आकडेवारीनुसार यामध्ये वाढ होऊन 1189.18 वर्ग किमी वनक्षेत्र झालयं. 2021 मध्ये झुडपी जंगलाचं क्षेत्र 43.67 होते. हे प्रमाण वाढून 2023 मध्ये 44.06 टक्क्यांवर आलंय.

भारत देशात वनक्षेत्रात वाढ झाली असताना चंद्रपूर जिल्ह्यातील वनक्षेत्रामध्ये घट झालीये.. त्यामुळे वनक्षेत्रामध्ये घट झाल्यानं ही धोक्याची घंटा असल्याची भीती पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केलीये.

चंद्रपूर जिल्ह्यात वाघ आणि मानव असा संघर्ष वाढलेला असताना भ्रमंतीचे मार्ग सुद्धा तुटलेत. त्यामुळे वनक्षेत्रात झालेली घट ही चिंतेची बाब आहे.. याकडे सर्वांनी लक्ष देऊन वनक्षेत्र वाढवण्यासाठी कार्य करण्याची गरज आहे.