मोहम्मद सिराजवर ICC ची मोठी कारवाई, ट्रेव्हिस हेड मात्र स्वस्तात सुटला

Border Gavaskar Trophy : मैदानात दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली यावरून आता आयसीसीने मोहम्मद सिराज आणि ट्रेव्हिस हेड या दोघांवर कारवाई केली आहे. मात्र या कारवाईमुळे मोहम्मद सिराजचं मोठं नुकसान झालंय.

पुजा पवार | Updated: Dec 9, 2024, 07:10 PM IST
मोहम्मद सिराजवर ICC ची मोठी कारवाई, ट्रेव्हिस हेड मात्र स्वस्तात सुटला title=
(Photo Credit : Social Media)

Border Gavaskar Trophy : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात पार पडलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील (Border Gavaskar Trophy) दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 10 विकेट्सने विजय मिळवला. मात्र या सामन्यापेक्षा जास्त चर्चा ही भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेव्हिस हेड (Travis Head) यांच्यातील वादाची झाली होती. मैदानात दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली यावरून आता आयसीसीने मोहम्मद सिराज आणि ट्रेव्हिस हेड या दोघांवर कारवाई केली आहे. मात्र या कारवाईमुळे मोहम्मद सिराजचं मोठं नुकसान झालंय.

एडिलेडमध्ये पिंक बॉल टेस्ट खेळताना मैदानात गोलंदाज मोहम्मद सिराज आणि फलंदाज ट्रेव्हिस हेड यांच्यात मोठा वाद झाला. आयसीसीने सिराजवर 20 टक्के मॅच फीचा  दंड ठोठावला आहे. सिराजला ही शिक्षा ट्रेव्हिस हेडसोबत झालेल्या वादामुळे मिळाली होती. परंतु सिराजवर दंडात्मक कारवाई करताना आयसीसीने ट्रेव्हिस हेडवर कोणताही दंड ठोठावलेला नाही. मात्र सिराज आणि हेड या दोघांना आयसीसीने 1-1 डिमेरिट पॉइंट दिले आहेत. 

हेही वाचा : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, 24 तासाच्या आत गमावलं नंबर 1 चं स्थान, भारत कितव्या स्थानी?

आयसीसीने कारवाई करताना काय म्हटले?

आयसीसीने ट्रेव्हिस हेड आणि मोहम्मद सिराजवर कारवाई करताना म्हटले की, 'सिराज आणि हेड यांनी मैदानात एकमेकांना दिलेल्या वागणुकीमुळे त्यांना अनुशासनात्मक रेकॉर्डमध्ये 1-1 डिमेरिट पॉईंट्स देण्यात येईल. ही मागील 24 महिन्यातील त्यांच्यावरील पहिली कारवाई आहे. गेल्या 24 महिन्यातील ही सिराज आणि हेडची पहिलीच चूक असल्याने दोघांवर सामना न खेळण्याचा बॅन लावण्यात आलेला नाही'. त्यामुळे 14 डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या ब्रिसबेन टेस्ट सामन्यात ते दोघे आपापल्या संघाचा भाग असू शकतात. 

आयसीसीने सिराजला आचारसंहितेच्या कलम 2.5 चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. त्यानुसार खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफविरुद्ध अपशब्द वापरल्यास संबंधित खेळाडूवर कारवाई केली जाते. तर ट्रेव्हिस हेड हा आचारसंहितेच्या कलम 2.13 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळला आहे. त्यानुसार गैरवर्तन करणाऱ्या खेळाडूंवर किंवा सपोर्ट स्टाफवर कारवाई केली जाते. सिराज आणि हेड या दोघांनी मॅच रेफरी रंजन मदुगले समोर आपल्यावर लागलेला आरोप स्वीकारले आहेत. त्यामुळे सुनावणीची गरज पडली नाही आणि आयसीसीने दोघांना दोषी ठरवून त्यांना शिक्षा दिली. 

हेड आणि सिराज यांच्यात काय झालं होतं? 

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना हा एडिलेड येथे झाला होता. या सामन्यात  ट्रेव्हिस हेडने 140 धावा बनवल्या आणि सिराजने टाकलेल्या बॉलवर तो आउट झाला. यावेळी मैदानात दोन्ही खेळाडूंमध्ये वादावादी झाली. हेडने पत्रकार परिषदेत सांगितले की, त्याने सिराजच्या गोलंदाजीची प्रशंसा केली होती, मात्र सिराजने याचे खंडन केले आणि ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने आपल्याशी चुकीचे वर्तन केल्याचे मुलाखतीत म्हटले. सिराज आणि हेडमध्ये झालेल्या या भांडणानंतर ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी सिराजला भर मैदानात हूटिंग केले.

सामन्यात काय घडलं? 

पर्थ येथील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान झालेला पहिला सामना जिंकून भारताने 1-0 अशी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्सने जिंकून सीरिजमध्ये 1-1अशी बरोबरी साधली आहे. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या इनिंगमध्ये 19 धावांचं टार्गेट मिळालं होतं. यावेळी एकही विकेट न गमावता 22 धावा करून ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला. 

बॉर्डर गावसकर ट्रॉफीचं वेळापत्रक : 

पहिली  टेस्‍ट: 22 ते  26 नोव्हेंबर 
दुसरी टेस्‍ट: 6 ते 10 डिसेंबर 
तिसरी टेस्‍ट: 14 ते 18 डिसेंबर 
चौथी टेस्‍ट: 26 ते 30 डिसेंबर 
पाचवी टेस्‍ट: 3 ते 7 जानेवारी