Modi Did Not Support Vinesh Phogat: ऑलिम्पिकमध्ये भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पार्टीला विनेश अपात्र ठरल्याने आनंदाच्या उकळ्या फुटत असतील असा टोला राऊत यांनी लगावला आहे. विनेशने ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकणं सत्ताधाऱ्यांना पचलं नसतं, असं राऊत म्हणालेत. विनेश ही लाडकी बहीण नसल्याने तिच्याबरोबर असं घडल्याचा दावा राऊत यांनी लगावला आहे.
"विनेश फोगाटचे सुवर्ण पदक मोदी व त्यांच्या लोकांना पचवणे कठीण गेले असते. कारण विनेश ही भाजपची ‘लाडकी कन्या’ किंवा ‘लाडकी बहीण’ नाही. लाडक्या बहिणी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या करत नाहीत. विनेशने ती चूक केली. ‘जंतर मंतर’वर तिने देशातील असंख्य लाडक्या बहिणी व कन्यांवरील शोषणाविरुद्ध आवाज उठवला. अनेक रात्री त्यासाठी दिल्लीच्या ‘जंतर मंतर’वर जागून काढल्या. न्याय मिळत नाही व भाजपचे सरकार ऐकत नाही हे दिसल्यावर विनेशने सर्व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदके पंतप्रधानांच्या दारात ठेवली. विनेशला बदनाम करण्याची एकही संधी तेव्हा भाजपने सोडली नव्हती. अशा विनेशला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळणे म्हणजे भाजप सरकारला थप्पड बसण्यासारखेच आहे. देशाची पाचवी अर्थव्यवस्था व त्या व्यवस्थेचे विश्वगुरू आपल्या लाडक्या कन्येच्या पाठीशी उभे राहिले नाहीत याची नोंद इतिहासात राहील," अशी टीका राऊत यांनी केली आहे.
"काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी लोकसभेत सांगितले की, “विनेशचे पदक गेल्याने देशाला दुःख झाले, पण भाजपला बहुधा आनंदाच्या उकळ्या फुटताना दिसतात.’’ हेच सत्य आहे. भारताच्या आनंदावर ‘शंभर’ ग्राम भारी पडले. संशयास्पद शंभर ग्रामने भारताचा आनंद हिरावून घेतला. विश्वगुरू व त्यांचा सत्ताधारी पक्ष युक्रेनचे रशियाबरोबरचे युद्ध थांबवू शकले, पण ज्या फ्रान्सकडून ‘राफेल’ विकत घेतले, त्या फ्रान्समध्ये शंभर ग्राममुळे गमावलेले पदक मिळवू शकले नाहीत," असा टोला राऊत यांनी 'सामना'मधील 'रोखठोक' सदरामधून लगावला आहे.
"विनेश फोगाटचे वजन शंभर ग्रामने वाढले. विनेशच्या डोक्यावरचे केस कापले असते तरी शंभर ग्राम कमी झाले असते. शंभर ग्राम हा काय अपात्र ठरण्याचा ‘आकडा’ झाला? विनेश फोगाटचे वजन ‘सेमीफायनल’नंतर कसे वाढले? सेमी फायनलच्या विजयानंतर वजन वाढले त्या वेळी तिचे प्रशिक्षक व इतर वैद्यकीय अधिकारी काय करत होते? भारतीय कुस्ती संघटनेच्या दळभद्री राजकारणात विनेशने पॅरिस ऑलिम्पिकमधले कुस्तीतले सुवर्ण पदक गमावले काय? कुस्ती संघातील शोषणाविरुद्ध विनेशने आवाज उठवला तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी मौनव्रत धारण केले होते. ते मौनव्रत त्यांनी विनेशने ‘पदक’ गमावल्यावर सोडले. “देश की बेटी’’ असा उल्लेख करत पंतप्रधानांनी तिला धीर दिला व देश तुझ्या पाठीशी आहे असे सांगितले. त्याने काय होणार?" असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
"भारतातील जे लोक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे सदस्य आहेत, त्यांनी निषेध म्हणून लगेच राजीनामाच द्यायला हवा. नुसते स्तब्ध होऊन काय करणार?" असा सवाल लेखाच्या शेवटी संजय राऊत यांनी विचारला आहे.