'हा कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे?,' मिथाली राजने मुलाखतीत व्यक्त केला संताप, 'तुझं अख्खं करिअर...'

मिथाली राजने सक्रिय क्रिकेटर असताना संभाव्य वरांसोबतच्या चर्चेदरम्यान तिला विचारले गेलेले विचित्र प्रश्न उघड केले.  

शिवराज यादव | Updated: Dec 3, 2024, 07:00 PM IST
'हा कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे?,' मिथाली राजने मुलाखतीत व्यक्त केला संताप, 'तुझं अख्खं करिअर...' title=

भारतीय महिला क्रिकेटमध्ये मिथाली राजची गणना महान खेळाडूंमध्ये केली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिथाली राजच्या नावे अनेक रेकॉर्डची नोंद आहे. मिथाली राजने आपल्या आयुष्यात नेहमी क्रिकेटलाच प्राधान्य दिलं. क्रिकेटसाठी पूर्ण समर्पित असल्यानेच ती आजपर्यंत अविवाहित आहे. मात्र तिच्या लग्नासाठी प्रयत्न झाले नाहीत अशातली गोष्ट नाही. नुकतंच एका मुलाखतीत तिने तिच्या लग्नासाठी झालेले प्रयत्न आणि मुलांसह झालेली भेट याचा खुलासा केला. पॉडकास्टमध्ये हजेरी लावलेल्या मिथाली राजने तिच्या मावशीने सुचवलेल्या मुलासह लग्नाबद्दल झालेल्या चर्चेरसंबंधी सांगितलं. 

सर्वात यशस्वी महिला क्रिकेटर्समध्ये गणना होत असतानाही आपल्याला अनेक मुलांनी लग्नानंतर क्रिकेट सोडून मुलांची काळजी घेणं प्राधान्य असेल असं सांगितल्याचा खुलासा मिथाली राजने केला आहे. 

"प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला ते समजलं नव्हतं. ते मिताली राजशी बोलत होते). आता या सर्व भेटी माझ्या आईच्या बहिणीने ठरवलेल्या होत्या, म्हणून मी बोलण्यास होकार दिला. त्यामुळे त्यांना इतका आनंद व्हायचा की, ते थेट लग्नानंतरच्या चर्चा सुरु व्हायच्या. किती मुलं हवीत इथपर्यंत ते पोहोचत असे. मी बॅकफूटवर होते कारण त्या गोष्टी अशा होत्या ज्यांची मी कल्पनाही केली नव्हती. मी नेहमी भारतीय क्रिकेटबद्दल विचार करत असे. त्यामुळे मला किती मुले हवी आहेत किंवा मला क्रिकेट सोडावे लागेल अशी विधानं ऐकून मला धक्का बसला होता,” असं मिथालीने रणवीर अलाहाबादियाच्या शोमध्ये सांगितलं.

"तेव्हा मी भारतीय कर्णधार होते. त्यांच्यापैकी एकाने सांगितलं की तुला क्रिकेट सोडावे लागेल, कारण लग्नानंतर तुला मुलांची काळजी घ्यावी लागेल. मी अजूनही ती विधानं पचलेली नाहीत. मला त्याचे नाव आठवत नाही. सर्वात विचित्र प्रश्न त्याने मला विचारला होता की, 'माझ्या आईला काही झालं तर तू तिची काळजी घेशील की जाऊन क्रिकेट खेळशील?'. यावर माझं उत्तर होतं, 'हा कसला प्रश्न आहे?' तो म्हणाला, 'मला हे जाणून घ्यायचे आहे की तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे?' आणि मी उत्तर दिले, 'ते परिस्थितीवर अवलंबून असेल.' मी पुढे काय बोलले ते मला आठवत नाही," असं मिथालीने सांगितलं. 

मिथालीने यावेळी उघड केलं की, तिच्या काही मैत्रिणींनी तिला काही गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यास सांगितलं होतं, अन्यथा तिला जोडीदार कधीच मिळणार नाही. 

"मला आठवतं की माझ्या एका क्रिकेटर मित्राने सांगितलं होते की तुला थोडं जुळवून घ्यावं लागेल. कारण तुला अशी व्यक्ती कधीच सापडणार नाही जी तुला त्याच जीवनशैलीचे अनुसरण करू देईल. मी तिला सांगितलं की या प्रश्नाला काही अर्थ नाही. मी तोपर्यंत काही ठरवलं नव्हतं, पण त्यावेळी माझ्यात काहीतरी बदल झाला. मला वाटलं की, माझ्या पालकांनी त्याग केला आहे, मीदेखील खूप त्याग केला आहे आणि एका अनोळखी व्यक्तीसाठी मी ते सोडणार देणार नाही ज्याला त्याच्या घराची काळजी घेण्यासाठी मी करिअर सोडावं असं वाटतं,” असं ती म्हणाली.