लिंगभेदी प्रश्नाला मितालीचं सडेतोड उत्तर...

भारतात क्रिकेट म्हणजे धर्म आणि क्रिकेटर्स म्हणजे देव... आणि या देवावर निस्सीम प्रेम करणारेही अनेक... पण दुर्देवाने असं प्रेम भारतीय महिला क्रिकेट टीमला पर्यायाने महिला खेळाडूंना मिळताना दिसत नाही. याउलट लिंगभेद दर्शवणाऱ्या संतापजनक प्रश्नांना मात्र वारंवार सामोरे जावं लागतं. महिला क्रिकेट वर्ल्डकप सुरु होण्यापुर्वी अशाच एका प्रश्नाला कॅप्टन मिथाली राज सामोरी गेली... तिच्या रोखठोक उत्तराचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय.. 

Updated: Jun 28, 2017, 03:24 PM IST
लिंगभेदी प्रश्नाला मितालीचं सडेतोड उत्तर...  title=

मुंबई : भारतात क्रिकेट म्हणजे धर्म आणि क्रिकेटर्स म्हणजे देव... आणि या देवावर निस्सीम प्रेम करणारेही अनेक... पण दुर्देवाने असं प्रेम भारतीय महिला क्रिकेट टीमला पर्यायाने महिला खेळाडूंना मिळताना दिसत नाही. याउलट लिंगभेद दर्शवणाऱ्या संतापजनक प्रश्नांना मात्र वारंवार सामोरे जावं लागतं. महिला क्रिकेट वर्ल्डकप सुरु होण्यापुर्वी अशाच एका प्रश्नाला कॅप्टन मिथाली राज सामोरी गेली... तिच्या रोखठोक उत्तराचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय.. 

इंग्लंडमध्ये महिला क्रिकेट वर्ल्डकपला सुरुवात झालीय. पुरुषांच्या वर्ल्डकपची खडानखडा माहिती ठेवणारे आणि त्याप्रमाणे सुट्ट्या आखणाऱ्या आपल्या अनेकांना या वर्ल्डकपविषयी माहितीही नसेल... कारण स्पष्ट आहे, हा वर्ल्डकप महिलांचा आहे... वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी झालेल्या एका पत्रकार परिषदेत मिताली राजला एक प्रश्न विचारण्यात आला.

तुझा आवडता पुरुष क्रिकेटर कोण? अर्थात मिताली राजनं दिलेल्या उत्तराने त्या पत्रकाराची बोलतीच बंद झाली. 'तुम्ही हा प्रश्न पुरुष क्रिकेटपटूंना विचाराल का? तुमची आवडती महिला क्रिकेटर कोण... मला नेहमीच हा प्रश्न विचारला जातो...मात्र या प्रश्नाऐवजी तुमची आवडती महिला क्रिकेटर कोण हा प्रश्न विचारला गेला पाहिजे...' असं उत्तर मितालीनं दिलं. 

वारंवार अनुभवायला मिळणाऱ्या या स्त्री-पुरुष मतभेदाला मितालीने राखठोक उत्तर दिलं. तिच्या समर्थनार्थ सानिया मिर्झा, अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक खेळाडू पुढे आले. 

सानिया मिर्झाला काही महिन्यांपूर्वी अशाच एका प्रश्नाला सामोरे जावे लागले होते... 'आता तू सेटल कधी होणार?' असं विचारताच सानियानं दिलेलं उत्तरही तेवढंच तोडीचस तोड होतं. 'मुलींनी देशासाठी कितीही खेळा... नाव कमवा... पुरस्कार मिळवा पण जोपर्यंत तुम्हाला मुलं होत नाहीत तोपर्यंत तुम्ही 'सेटल' मानले जात नाहीत...' असं सानियाचं उत्तर होतं.

सानिया काय किंवा मिताली काय... महिला खेळाडूंना विचारले जाणारे असले प्रश्न म्हणजे आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीचं प्रदर्शन... महिला खेळाडूंच्या कर्त्वृत्वापेक्षाही अशा प्रकारचे प्रश्न ज्या दिवशी थांबतील त्याच दिवशी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'चा नारा सार्थकी लागेल. वेळ लागेल... पण या देशाच्या कन्या हे चित्र नक्कीच बदलवतील...