केदार इज बॅक! रणजीमध्ये घालतोय धुमाकूळ, ना रोहित ना कोहलीने दाखवला विश्वास!

2018 नंतर केदार जाधवचे प्रथम श्रेणीतील पहिलं शतक आहे. याआधी केदारने उत्तर प्रदेशविरूद्ध 327 धावांची खेळी केली होती. अवघ्या 17 धावांनी केदार जाधव आपल्या त्रिशतकापासून दूर राहिला.

Updated: Jan 6, 2023, 10:14 AM IST
केदार इज बॅक! रणजीमध्ये घालतोय धुमाकूळ, ना रोहित ना कोहलीने दाखवला विश्वास!  title=

Ranji Trophy : भारतीय संघामध्ये पुण्याच्या दोन खेळाडूंची निवड झाल्यामुळे रणजीमध्ये खेळण्याची संधी मिळालेल्या केदार जाधवने जबरदस्त पुनरागम केलं आहे. रणजीत महाराष्ट्र आणि आसाममध्ये (Ranji T Trophy Maharashtra vs Assam 2023) सुरू असलेल्या सामन्यात केदार जाधवने 283 धावांची खेळी केली. मात्र अवघ्या 17 धावांनी केदार जाधव आपल्या त्रिशतकापासून दूर राहिला.  (Kedar Jadhav smashes 283 run in ranji trophy against Assam making comeback after 3 year in FC Cricket)

पुण्याचे ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) यांची भारतीय संघात श्रीलंकेविरूद्धच्या टी-20 मालिकेत निवड झाली आहे. दोघांच्या अनुपस्थितीमुळे केदारला संघात खेळण्याची संधी मिळाली होती. केदारनेही संधीचं सोनं करत संघासाठी मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाचा वाटा उचलला.

केदार जाधवने 283 चेंडूंमध्ये 283 धावा केल्या, या खेळीमध्ये त्याने 21 चौकार आणि 12 षटकार मारले. प्रथम फलंदाजी करणारा आसामचा संघ 274 धावांवर ऑल आऊट झाला. महाराष्ट्राकडून सिद्धेश वीरने 106 धावा करत शतक केलं. महाराष्ट्राची 95 वर 2 बाद अशी स्थिती असताना खेळायला आलेल्या केदारने आपली शिस्तबद्ध फलंदाजी करत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा केदार 144 धावांवर नाबाद होता. तिसऱ्या दिवशी त्याने 187 चेंडूत त्याने 183 धावा जोडल्या. 

केदार जखमी झाल्यावर रिटायर झाला होता त्यानंतर चौथा गडी बाद झाल्यावर तो पुन्हा मैदानात उतरला. केदारने आपली बॅटींग चालू ठेवली होती मात्र त्रिशतकापासून 17 धावा राहिल्या असताना त्याला रियान परागने बाद केलं.  2018 नंतर केदार जाधवचे प्रथम श्रेणीतील पहिलं शतक आहे. याआधी केदारने उत्तर प्रदेशविरूद्ध 327 धावांची खेळी केली होती.

दरम्यान, महाराष्ट्राने पहिला डाव 594 /9 वर घोषित केला. चौथ्या दिवसाला आज सुरूवात होत असून 65 वर बिनबाद अशी सावध सुरूवात आसामने केली आहे. अजूनही 255 धावांनी आसामचा संघ पाठिमागे आहे.