मुंबई : दिग्दर्शक कबीर खान आपल्या 'ट्युबलाईट' या चित्रपटाला मिळालेलं अपयश पचवत एक नवाकोरा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. १९८३ मध्ये पार पडलेल्या क्रिकेट विश्वचषकावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग भारतीय संघाचे तत्कालीन कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत झळकणार आहे. तर त्यांच्या पत्नीची भूमिका साकारण्यासाठी बॉलिवूडमधल्या या अभिनेत्रीचं नाव पुढे येत आहे.
यासाठी कबीरने कतरिना कैफच्या नावाला प्राधान्य दिलं आहे. कबीरसोबत यापूर्वी देखील काम केल्याने या चित्रपटाच्या भूमिकेसाठी कतरिना देखील उत्सुक असल्याचे 'डीएनए' ने आपल्या वृत्तात म्हटले आहे. कपिल देव यांच्या पत्नी रोमी देव यांच्या भूमिकेसाठी तिच्या नावाला प्राधान्य देण्यात येत आहे.
कबीर खान किंवा चित्रपटाशी संबंधित कोणत्याही व्यक्तिने याबद्दलची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण, या चित्रपटासाठी दोन अभिनेत्रींची निवड करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात असून, त्यात एका नव्या चेहऱ्यालाही संधी मिळू शकण्याची चिन्हं आहेत. कतरिना आणि रणवीर या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले तर प्रेक्षकांना यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहता येईल.