Video: रोहित कुत्सित हसून जर्सीकडे पाहत म्हणाला, 'हा जोकच आहे, मी कॅप्टन असेपर्यंत...'

Rohit Sharma Reacts As Sri Lanka Win Series After 27 Years: भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धची दुहेरी मालिका गमावण्याची ही 27 वर्षांमधील पहिलीच वेळ असून या पराभवानंतर रोहितचं विधान चर्चेत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 8, 2024, 09:20 AM IST
Video: रोहित कुत्सित हसून जर्सीकडे पाहत म्हणाला, 'हा जोकच आहे, मी कॅप्टन असेपर्यंत...' title=
श्रीलंकेविरुद्ध मालिका गमावल्यानंतर रोहितचं विधान

Rohit Sharma Reacts As Sri Lanka Win Series After 27 Years: श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये बुधवारी भारताचा 2-0 ने पराभव झाला. मागील 27 वर्षांमध्ये पहिल्यांदाच श्रीलंकेने भारताबरोबरच्या दुहेरी मालिकेमध्ये भारताला पराभूत करण्याचा भीमपराक्रम करुन दाखवला आहे. असं असतानाच ही मालिका गमावल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माला जागतिक स्तरावर चॅम्पियन झाल्यानंतर भारतीय संघ आत्मसंतुष्ट झाला आहे का? या विषयावर सविस्तर बोलल्याचं पाहायला मिळालं. भारताचा तिसऱ्या सामन्यामध्ये 110 धावांनी पराभव झाल्यानंतर रोहित पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये बोलत होता. 

मी कर्णधार असेपर्यंत..

सामना संपल्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये रोहित शर्माला समालोचक रोशन अभयसिंघे यांनी टी-20 वर्ल्ड कपमध्ये जेतेपद पटकावल्यानंतर श्रीलंकन दौऱ्यावर आलेला भारतीय संघ आत्मसंतुष्ट आहे असं वाटलं नाही का? असा थेट सवाल केला. पहिल्यांदा हा प्रश्न ऐकून रोहित काही क्षण थांबला नंतर कुत्सितपणे हसला आणि त्याने ही असली शक्यता फेटाळून लावली. "नाही, मला नाही वाटतं असं. हा एक जोक आहे," असा प्रतिसाद रोहितने दिला. त्यानंतर भारतीय संघाच्या जर्सीवरील INDIA हे नाव आणि छातीवरील लोगेकडे पाहत रोहितने, "तुम्ही भारतासाठी खेळत असता तेव्हा कधीच आत्मसंतुष्ट नसता. त्यातही मी कर्णधार असेपर्यंत असं होणं शक्य नाही," असं सणसणीत उत्तर या प्रश्नाला दिलं. पुढे बोलताना, "खरं तर जिथे श्रेय दिलं पाहिजे तिथे दिलेच पाहिजे. श्रीलंकेचा संघ आमच्यापेक्षा जास्त चांगलं क्रिकेट खेळला, हे मान्य करावं लागेल. आम्ही परिस्थिती पाहून चेंडूची गती कमी करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच आज आम्ही असा संघ खेळवला. आम्ही संपूर्ण मालिकेमध्ये चांगला खेळ केला नाही. त्यामुळेच आम्ही आज पराभूत संघ म्हणून इथे उभे आहोत," असं रोहितने सांगितलं. 

फिरकीपटूंविरुद्ध भारताने गमावल्या 27 विकेट्स; रोहित म्हणतो...

भारतीय संघासाठी श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेमध्ये फिरकी गोलंदाजी हा सर्वात मोठा प्रश्न ठरला तरी तो फारसा चिंतेचा विषय नाही असं रोहितने मान्य केलं. भारतीय संघाने फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर तब्बल 27 विकेट्स गमावल्या. किमान तीन सामन्यांचा समावेश असलेल्या आतापर्यंतच्या क्रिकेट इतिहासामधील कोणत्याही दोन संघाच्या मालिकेचा विचार केल्यास ही संख्या सर्वाधिक असून हा सुद्धा एका विक्रमच आहे. 249 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 26.1 ओव्हरमध्ये 138 धावांवर तंबूत परतला. या सामन्यात भारताचे 9 गडी फिरकी गोलंदाजीवर बाद झाले.

नक्कीच गांभीर्याने याकडे पाहण्याची गरज

"फिरकी गोलंदाजी खेळणे हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे असं मला वाटत नाही. मात्र याकडे नक्कीच गांभीर्याने पाहाणं गरजेचं आहे. वैयक्तिक धोरणं आणि ध्येय काय होती असले पाहिजेत. या मालिकेमधील तणावासंदर्भात आम्ही नक्कीच चर्चा केली पाहिजे," असं रोहित म्हणाला.