Action Against Antim Panghal In Olympics 2024: भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट 50 किलो वजनी गटामध्ये अपात्र ठरल्याने भारताला मोठा धक्का बसलेला असतानाच आता अन्य एका भारतीय महिला कुस्तीपटूला थेट पॅरीस सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंतिम पंघाल (Antim Panghal) असं या कुस्तीपटूचं नाव असून तिची ऑलिम्पिक व्हिलेजमधील सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. इतकच नाही तर अंतिमला थेट पॅरीस सोडण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. अंतिम पंघालविरुद्ध तिच्या बहिणीमुळे कारवाई झाली आहे.
अंतिमच्या बहिणीला चुकीचं अॅक्रिडेशन कार्ड म्हणजेच ओळखपत्र दाखवून ऑलिम्पिक कॅम्पसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताना सुरक्षा अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं. अंतिमची बहीण निशाला या गुन्ह्यासाठी पॅरिस पोलिसांनी काही काळासाठी ताब्यात घेतलं होतं. मात्र भारतीय ऑलिम्पिक महासंघाने हस्ताक्षेप करुन पॅरीस पोलिसांनी निशाला समज देऊन सोडून दिलं. मात्र या प्रकरणामुळे नाचक्की जाल्याने भारतीय ऑलिम्पिक महासंघाने अंतिमला तिचे प्रशिक्षक, भाऊ आणि बहिणीसहीत तातडीने पॅरीस सोडण्याचे आदेश दिले आहेत.
हा सारा प्रकार 7 ऑगस्ट रोजी घडला आहे. पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या अंतिमचा प्रवास पहिल्याच सामन्यात संपुष्यात आला. 53 किलो वजनी गटातून खेळताना पात्रता फेरीच्या पहिल्याच सामन्यात अंतिम 0-10 ने पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडली. अवघ्या 101 सेकंदांमध्ये अंतिम पराभूत झाली.
नक्की वाचा >> Photos: 'एक रात्रही...', 20 वर्षीय खेळाडूला Olympics मधून हाकललं; म्हणाले, 'तिच्यामुळे संघात अयोग्य...'
समोर आलेल्या माहितीनुसार अंतिम पंघाल पराभवानंतर तिच्या खासगी प्रशिक्षकांना आणि स्पेरिंग पार्टनरला भेटायला गेली होती. त्यावेळेस तिने स्वत:चं खास ओळखपत्र बहीण निशाला दिलं आणि खेळाडूंची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेल्या ऑलिम्पिक व्हिलेजमधून सामान घेऊन येण्यास सांगितलं. मात्र या ठिकाणी खेळाडू वगळता इतर कोणालाही प्रवेश नसतानाच बहिणीचं कार्ड वापरुन प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना अंतिमच्या बहिणीला म्हणजे निशाला सुरक्षारक्षकांनी पकडल्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आलं. आता स्पर्धेतील अंतिमचं आव्हान संपुष्टात आल्याने आणि तिने नियमांचं उल्लंघन केल्याने तिला तातडीने पॅरीस सोडण्याचे आदेश भारतीय ऑलिम्पिक महासंघाने दिले आहेत.
नक्की वाचा >> तासाचे 2 कोटी रुपये देतो, फक्त..; गुप्तांगामुळे ऑलिम्पिकबाहेर पडलेल्याला 'तसल्या' कंपनीची जॉब ऑफर
ऑलिम्पिक व्हिलेज हे खास ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या सोयीसाठी तयार करण्यात आलं असून येथे प्रवेशासंदर्भातील नियम फार कठोर आहेत. या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी प्रत्येक खेळाडूला विशेष कार्ड देण्यात आले आहेत. अंतिमच्या नावाने असलेले हेच कार्ड तिच्या बहिणीने वापरण्याचा प्रयत्न करुन नियमांचं उल्लंघन केल्याने तिच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. आता या कारवाईमुळेच अंतिमसहीत तिच्या सोबतच्या चौघांना पॅरीस सोडावं लागणार आहे.