IPL 2024: राजस्थान रॉयल्सविरोधातील (Rajasthan Royals) सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) शतक ठोकलं. विराट कोहलीने 156.94 च्या स्ट्राइक रेटने 72 चेंडूत 113 धावा ठोकल्या. विराट कोहलीने एकाकी झुंज दिल्याच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 3 गडी गमावत 183 धावा केल्या. मात्र राजस्थान रॉयल्सने 19.1 ओव्हरमध्येच हे टार्गेट पूर्ण केलं. जोस बटलरने 172.41 च्या स्ट्राइक रेटने 58 चेंडूत 100 धावा केल्या. दरम्यान विराटने शतक ठोकण्यासाठी 67 चेंडू खेळले. विराटने आयपीएल सर्वात धीम्या शतकाची नोंद केली आहे. सोशल मीडियावरही विराटने फार धीमी खेळी केल्याची टीका होत आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवागला सामन्याच्या मध्यात विराट कोहलीच्या स्ट्राइक रेटबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावर तो म्हणाला होता की, "मला वाटतं बंगळुरुकडे 20 धावा मागे आहे. जर विराटबद्दल बोलायचं गेल्यास त्याने चांगली खेळी केली. पण ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, कॅमेरुन ग्रीन फलंदाजीला आले नाहीत. कोणीही त्याच्यासोबत शेवटपर्यंत टिकलं नाही. विराट कोहलीचा स्ट्राइर रेट वरती गेला होता. याचं कारण तुम्ही 39 चेंडूत अर्धशतक ठोकल्यानंतर स्ट्राइक रेट वरती जातो. पण विराट वगळता कोणी चांगली कामगिरी केली नाही. सगळा दबाव कोहलीवरच होता".
"विराट कोहली फॉर्ममध्ये आहेत. ही त्याची भूमिका असून, तो शेवटपर्यंत निभावेल. इतर खेळाडू ज्यांच्यासाठी जास्त पैसे मोजण्यात आले आहेत, त्यांनीही आपलं नाणं खणखणीत वाजवलं पाहिजे. पण आज कोणीही चांगलं खेळलं नाही," अशी टीका विरेंद्र सेहवागने केली.
विराट कोहलीने शतक ठोकताना 12 चौकार आणि 4 षटकार लगावले. कर्णधार फाफ डु प्लेसिसने 33 चेंडूत 44 धावा ठोकत विराट कोहलीला चांगली साथ दिली. पण इतर कोणताही फलंदाज मोठी भागीदारी करु शकला नाही. 39 चेंडूंमध्ये अर्धशतक केल्यानंतर विराट कोहलीने पुढील अर्धशतकासाठी फक्त 28 चेंडू घेतले.
कोहली आणि डु प्लेसिसने 125 धावांची सलामी भागीदारी करताना पहिल्यांदा संघाला चांगली सुरुवात करुन दिली. आयपीएलमधील आरसीबीची आतापर्यंतची सर्वोत्तम सुरुवात होती. पण राजस्थान रॉयल्सने बंगळुरुचा पराभव करत विराट कोहलीचं शतक व्यर्थ ठरवलं.
जॉस बटलरची शतकीय खेळी विराट कोहलीच्या शतकीय खेळीवर भारी पडली. राजस्थानने 6 विकेट्सने बंगळुरुवर विजय मिळवला. बंगळुरुने 184 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना संजू सॅमसन आणि जॉस बटलरने धमाकेदार खेळी केली अन् सलग चौथ्या विजयाची नोंद केली.