IPL 2024 Jos Buttler Century: आयपीएलच्या 19 मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरवर 6 विकेट्सनी विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2024 मधील सलग चौथा विजय मिळवला. संजू सॅमसनच्या टीमने या सिझनमध्ये आतापर्यंत एकही सामना गमावला नाही. तर आरसीबीच्या एकूण 5 मॅचमधील हा चौथा पराजय आहे. या मॅचमध्ये आरसीबीसाठी विराट कोहलीने तर राजस्थानसाठी बटलरने सेंच्युरी लगावली. बटलरने सिक्सर ठोकून मॅच संपवली आपली सेंच्युरीदेखील पूर्ण केली. आयपीएलमधील त्याची ही शंभरावी मॅच होती. त्याने हा क्षण ऐतिहासिक बनवला.
बटलरने आपल्या शंभराव्या आयपीएल मॅचमध्ये शतक लगावून टीमला विजय मिळवून दिला. आयपीएलच्या इतिहासात असं करणारा तो दुसरा बॅट्समन ठरला. त्याच्याआधी 2022 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळताना केएल राहुलने शंभराव्या मॅचमध्ये शतक लगावून लखनौच्या टीमला विजय मिळवून दिला होता. ब्रेबोनच्या स्टेडियमध्ये झालेल्या सामन्यात केएल राहुलने 103 धावांची दमदार खेळी केली होती. आता या यादीत बटलरचे नावदेखील जोडले गेले आहे.
एकीकडे विराट कोहलीने आयपीएलमध्ये आपले आठवे तर दुसरीकडे बटलरने सहावे शतक ठोकले. बटलर आयपीएलमध्ये सर्वात जास्त शतक ठोकणारा जॉइंट सेकंड प्लेयर बनला. त्याने वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलच्या रेकॉर्डची बरोबरी केली. गेलने आयपीएलमध्ये 6 शतक लगावले होते. केएल राहुल, डेविड वॉर्नर आणि शेन वॉटसनच्या नावे 4-4 शतक आहेत.
विराट कोहलीने आरसीबीसाठी एकूण आठ शतक ठोकले आहेत.अशावेळी त्याची टीम तिसऱ्यांदा हरली आहे. अशाप्रकारे आयपीएल मॅचमध्ये हरणाऱ्या टीमसाठी सर्वात जास्त शतक ठोकणारा खेळाडू ठरला. त्याने लाजिरवाणा रेकॉर्ड आपल्यानावे केला. हाशिम अमला आणि संजू सॅमसनला मागे टाकले. अमला आणि सॅमसनने प्रत्येकी 2-2 शतक लगावले होते. या सामन्यात त्यांची टीम हरली होती.
विराट कोहलीच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेजर्स बंगळूरने पहिल्या डावात बॅटींग करताना 3 विकेटच्या बदल्यात 183 रन्स केले. पण राजस्थान रॉयल्सनेदेखील याला तोडीस तोड उत्तर दिले. आरसीबीच्या आव्हानाला राजस्थान रॉयल्सच्या रॉस बटलरने नाबाद शतकी खेळी करुन जशास तसे उत्तर दिले. यामध्ये राजस्थानच्या टीमने 5 चेंडू राखून सामना खिशात टाकला.