सनरायजर्स हैदराबादने आयपीएलमध्ये इतिहास रचला, 20 दिवसातच तोडला 277 धावांचा महाविक्रम

IPL 2024 SRH vs RCB : आयपीएलच्या तिसाव्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने महाविक्रम रचला. बंगुरुळच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर सनराजयर्स हैदाराबादने 22 षटकार आणि 19 चौकारांची बरसात करत स्वत:चाच सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला

राजीव कासले | Updated: Apr 15, 2024, 10:06 PM IST
सनरायजर्स हैदराबादने आयपीएलमध्ये इतिहास रचला, 20 दिवसातच तोडला 277 धावांचा महाविक्रम  title=

IPL 2024 SRH vs RCB : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या सतराव्या हंगामात रेकॉर्डब्रेक सामने पाहायला मिळतायत. आयपीएलच्या तिसाव्या सामन्यात सनरायजर्स हैदाबादने (Sunrisers Hyderabad) सर्वाधिक धावांचा महाविक्रम रचला आहे. सनरायजर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध (Royal Challengers Bengaluru) खेळताना तब्बल 287 धावांचा डोंगर उभा केला. या खेळीत हैदराबादने तब्बल 22 षटकार आणि 19 चौकारांची बरसात केली.

अवघ्या 20 दिवसात सनरायजर्स हैदाराबादने स्वत:चाच सर्वाधिक धावांचा विक्रम मागे टाकला. 27 मार्चला हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध 277 धावांचा डोंगर उभा केला होता. हैदराबादने आरसीबीचा (RCB) 264 सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला होता. आता 287 धावा करत हैदराबादने आयपीएलमध्ये महाविक्रम रचला आहे. 

ट्रेव्हिस हेडची तुफान फटकेबाजी
होम ग्राऊंडवर आरसीबीनचा कर्णधार फार डू प्लेसिसने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्याला चांगलाच महागात पडला. हैदराबादचा सलामीचा फलंदाज ट्रेव्हिस हेडने  (Travis Head) पहिल्या षटकापासूनच तुफान फटकेबाजी करत बंगळुरुच्या गोलंदाजांची पिसं काढली. हेडने अवध्या 20 चेंडूत अर्धशतक झळकावलं. त्यानंतर 39 चेंडूत शतक ठोकलं. आयपीएलमध्ये वेगवान शतकांच्या यादीत हेडने चौथं स्थान पटकावलं आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यातही हेडने सर्वाधिक धावा केल्या होत्या. आरसीबीविरुद्ध ट्रेव्हिस हेडने 41 चेंडूत 9 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 102 धावांची तुफानी खेळी केली.

हेनरिक क्लासेनने केली षटकारांची बरसात
ट्रेव्हिस हेडनंतर तिसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या हेनरिक क्लासेनने (Heinrich Klaasen) फलंदाजाची सर्व सूत्र आपल्या हाती घेतली. क्लासनने अवघ्या 31 चेंडूत 7 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 67 धावा केल्या. याशिवाय युवा फलंदाज अभिषेक शर्मा, अॅडम मारक्रम आणि अब्दुल समदनेही वाहत्या पाण्यात हात धुवून घेतले. अभिषेकने 22 चेंडूत 34 धावाकल्या. तर मारक्रमने 17 चेंडूत  2 षटकार ठोकत 32 धाला केल्या. अब्दुल सदमने अखेरच्या षटकात तुफान फटकेबाजी करत अवघ्या 10 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांची बरसात करत 37 धावा केल्या.

आयपीएलमधली सर्वाधिक धावसंख्या

287/3 एसआरएच विरुद्ध आरसीबी - बंगळुरु 2024
277/3 एसआरएच विरुद्ध एमआई - हैदराबाद 2024
272/7 केकेआर विरुद्ध डीसी - विजाग 2024
263/5 आरसीबी विरुद्ध पीडब्ल्यूआई - बंगळुरु 2013
257/7 एलएसजी विरुद्ध पीके - मोहाली 2023