वर्ल्डकपचा उल्लेख करत हरभजनचा रोहित, द्रविडला धोक्याचा इशारा! म्हणाला, 'तो फार..'

IPL 2024 WARNING By Harbhajan Singh: हरभजन सिंगने जून महिन्यात होत असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेआधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि राहुल द्रविडला इशारा देत एका खेळाडूसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 15, 2024, 03:34 PM IST
वर्ल्डकपचा उल्लेख करत हरभजनचा रोहित, द्रविडला धोक्याचा इशारा! म्हणाला, 'तो फार..' title=
हरभजनने दिला इशारा

IPL 2024 WARNING By Harbhajan Singh: इंडियन प्रिमिअर लीगच्या यंदाच्या पर्वामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाच्या गोलंदाजांना लय गवसलेली नाही. यंदाच्या आयपीएलमधील जवळपास 30 सामने होत आले तरी आरसीबीचा संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी आहे. आरसीबीच्या गोलंदाजांची कामगिरी पाहून भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने एक वेगळीच चिंता व्यक्त केली आहे. जून महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आरसीबीच्या गोलंदाजाची अवस्था पाहता भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडचं टेन्शन वाढू शकतं असं हरभजन सिंगने म्हटलं आहे.

मुंबईविरुद्ध भरपूर धावा दिल्या...

हरभजन सिंगने ज्या पद्धतीने मोहम्मद सिराज गोलंदाजी करत आहे ते पाहता तो फार थकलेला वाटतोय, असं निरिक्षण नोंदवलं आहे. मोहम्मद सिराजला ग्लानी आल्यासारखं वाटत असून त्याला आराम देण्याची गरज असल्याचं हरभजनने म्हटलं आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये सिराजने भरपूर धावा दिल्या आहेत. मुंबईविरुद्धच्या सामन्यामध्ये सिराजच्या गोलंदाजीवर 37 धावा मुंबईच्या फलंदाजींनी कुटल्या. वानखेडेमधील या सामन्यानंतर बोलताना सिंगने आपण संघ व्यवस्थापनाचा भाग असतो म्हणजे कर्णधार रोहित शर्मा किंवा प्रशिक्षक राहुल द्रविडच्या जागी असतो तर नक्कीच सिराजला काही सामन्यांसाठी आराम दिला असता किंवा त्यासंदर्भातील प्रयत्न केले असते, असं म्हटलं आहे. यावेळेस हरभजनने सिराजच्या क्षमतेवर आणि कौशल्यावर आपल्याला थोडीही शंक नसल्याचं नमूद केलं. नवीन चेंडूने भारतीय संघाला विकेट मिळवून देणारा हाच गोलंदाज असला तरी त्याला सध्या आरामची अत्यंत आवश्यकता आहे, असं मत हरभजनने व्यक्त केलं आहे.

जे आवश्यक आहे ते तो करत नाहीये...

"मी संघ व्यवस्थापनाचा भाग असतो तर मी त्याला काही सामन्यांसाठी विश्रांती दिली असते. त्याला थोडी विश्रांती देऊन आत्मपरिक्षणाची संधी देणं गरजेचं आहे. याच सिराजने भारतीय संघाला कसोटी असो, एकदिवसीय क्रिकेट असो किंवा टी-20 क्रिकेट असो नवीन चेंडूने विकेट्स मिळवून दिल्या आहेत. तो भारतीय संघासाठी सामना जिंकवून देणारा गोलंदाज आहे. अर्थात आरसीबीसाठीही तो तितकाच महत्त्वाचा आहे. मला वाटतंय त्याने जे करणं गरजेचं आहे ते तो करत नाहीये," असं हरभजनने सिंगने म्हटलं आहे.

नक्की पाहा >> ..अन् मैदानात रोहित शर्माची पॅण्टच सरकली! CSK vs MI सामन्यातील 'तो' Video व्हायरल

तो सातत्याने क्रिकेट खेळतोय

सिराज हा शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या थकलेला असल्याचंही हरभजनने म्हटलं आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेचा विचार करता सिराज अधिक सक्षम आणि सुदृढ असणं गरजेचं असल्याचं हरभजनने म्हटलं आहे. "मला वाटतं की तो फारच थकलेला आहे. तो मानसिक आणि शारीरिक दृष्यट्याही थकलेला आहे. तो मागील काही काळापासून सातत्याने क्रिकेट खेळत आहे. तो इंग्लंडविरुद्ध 4 कसोटी सामने खेळला असून त्याने अनेक ओव्हर्स टाकल्या आहेत," असं हरभजन म्हणाला. हरभजनने स्वत:संदर्भातील अनुभवही यावेळेस सांगितलं.

मी सुद्धा असा परिस्थितीमधून

"तो फार थकलेला वाटतोय. सामन्यात अशाप्रकारची (मुंबईविरुद्ध झाली तशी) धुलाई झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा उठून सर्वकाही ठिक असल्यासारखं वागणं कठीण आहे. मी अशा परिस्थितीमधून गेलो आहे. अशावेळी तुम्ही स्वत:ला थोडा वेळ दिला पाहिजे. तुम्ही तुमच्या खेळासंदर्भात विचार केला पाहिजे. थोडी विश्रांती घेतली पाहिजे. मला विश्वास आहे की तो दमदार पुनरागमन करेल," असं हरभजन म्हणाला.