IPL आधी एबी डेव्हिलिअर्सची मोठी भविष्यवाणी! विराटबद्दल केला दावा, यशस्वीचाही केला उल्लेख '600 धावा...'

IPL 2024: आयपीएल स्पर्धा सुरु होण्याआधी कोणता खेळाडू चांगली कामगिरी करेल, तसंच कोणता संघ चॅम्पियन होईल यासंबंधी वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. यादरम्यान एबी डेव्हिलिअर्सने मोठी भविष्यवाणी केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Mar 21, 2024, 03:09 PM IST
IPL आधी एबी डेव्हिलिअर्सची मोठी भविष्यवाणी! विराटबद्दल केला दावा, यशस्वीचाही केला उल्लेख '600 धावा...' title=

IPL 2024: आयपीएल स्पर्धा सुरु होण्याआधी कोणता खेळाडू चांगली कामगिरी करेल, तसंच कोणता संघ चॅम्पियन होईल यासंबंधी वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. क्रिकेट तज्ज्ञांकडूनही आपले अंदाज मांडत भविष्यवाणी केली जात आहे. या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी तसंच विराट कोहली यांच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल. विराट कोहली मोठ्या विश्रांतीनंतर क्रिकेटच्या मैदानात परतणार आहे. मुलाच्या जन्मासाठी विराट कोहलीने संघातून विश्रांती घेतली होती. आयपीएलच्या निमित्ताने विराट कोहली पुन्हा खेळताना दिसणार असून आगामी टी-20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर त्याच्याकडे लक्ष असेल. 

विराट कोहली खेळणार असल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या चाहत्यांमध्ये उत्साह आहे. बंगळुरु संघ एकदाही विजेतेपद पटकावू शकलेला नाही. मात्र यानंतर चाहत्यांना विराटवर पूर्ण विश्वास असून तो ही कामगिरी करुन दाखवेल असा विश्वास आहे. दक्षिण आफ्रिकेचा आणि बंगळुरुचा माजी खेळाडू एबी डेव्हिलिअर्सनेही विराट कोहलीवर विश्वास दाखवला आहे. या आयपीएलमध्ये विराट कोहली सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल असं मत त्याने मांडलं आहे. 

एबी डेव्हिलिअर्सने आपल्या युट्यूब चॅनेलवर म्हटलं आहे की, "विराट कोहली महान खेळाडू आहे. 200 आयपीएल सामने, 7 हजारांपेक्षा अधिक धावा, हे अविश्वसनीय आहे. विराट कोहलीची क्रिकेटमधील अनुपस्थिती जाणवत होती. आगामी हंगामात तो सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करण्यासाठी प्रयत्नशील आहे".

एबी डेव्हिलिअर्सने यशस्वी जैसवालचंही तोंडभरुन कौतुक केलं आहे. यशस्वी जैसवाल राजस्थान रॉयल्स संघातून खेळत आहे. "यशस्वी एक असा खेळाडू आहे ज्याला खेळताना पाहण्याची मी वाट पाहत आहे. कसोटीमध्ये त्याने आपण काय करु शकतो हे दाखवून दिलं आहे. आता टी-20 क्रिकेटमध्ये आपली प्रतिभा दाखवण्याची संधी त्याच्याकडे आहे. त्याला कसोटी मालिकेमुळे चांगला आत्मविश्वास मिळाला आहे. आयपीएलमध्ये तो जबरदस्त कामगिरी करेल अशी आशा आहे. यशस्वी 500 किंवा 600 धावा करु शकतो," असं एबी डेव्हिलिअर्सने म्हटलं आहे.

एबी डेव्हिलिअर्स आणि विराट कोहली हे फार चांगले मित्र आहेत. एबी डेव्हिलिअर्स बंगळुरु संघातून खेळत असताना दोघांनी संघाला अनेक सामने जिंकवून दिले होते. पण दोघेही मिळूनही आयपीएल ट्रॉफी जिंकू शकले नव्हते. अखेर 2021 मध्ये एबी डेव्हिलिअर्सने क्रिकेटमधून संन्यास जाहीर केला होता. 

एबी डेव्हिलिअर्सची गणना महान खेळाडूंमध्ये केली जाते. एबी डेव्हिलिअर्सने देशासाठी खेळताना 114 कसोटी सामन्यात 91 डावांमध्ये 50.66 च्या सरासरीने 8765 धावा केल्या. यामध्ये 22 शतकं आणि 46 अर्धशतकं आहेत. कसोटीमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या 278 धावा आहे. 

एबी डिव्हिलियर्सने 228 एकदिवसीय सामने खेळले असून 53.50 च्या सरासरीने 9577 धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 25 शतकं आणि 53 अर्धशतकं आहेत. तसंच टी-20 मध्ये 78 सामने खेळले आणि 1672 धावा केल्या.