IPL 2024 : एमएएस धोनीचं टेन्शन वाढलं, एकदिवस आधीच मॅच विनर खेळाडू बाहेर...

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामाची सुरुवात महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स आणि फाप डू प्लेसिसच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यानच्या सामन्याने होणार आहे. पण स्पर्धेला अवघा एक दिवस बाकी असताना चेन्नईच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. 

राजीव कासले | Updated: Mar 21, 2024, 02:55 PM IST
IPL 2024 : एमएएस धोनीचं टेन्शन वाढलं, एकदिवस आधीच मॅच विनर खेळाडू बाहेर...  title=

IPL 2024 CSK vs RCB : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा सतरावा हंगाम सुरु होण्याच्या एक दिवस आधीच महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला (CSK) मोठा धक्का बसला आहे. आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यान (RCB) रंगणार आहे. गेल्या म्हणजे 2023 च्या हंगामात चेन्नईने अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करत पाचव्यांदा जेतेपद पटकावलं होतं. आता सहाव्या जेतेपदासाठी चेन्नईचं मिशन आयपीएल शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. पण चेन्नईच्या सुरुवातीच्या काही सामन्यात मॅच विनर खेळाडू खेळणार नाहीए. 

चेन्नई सुपर किंग्सला धक्का
चेन्नईचा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट मथीशा पथिराना (Matheesha Pathirana) हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. 21 वर्षांचा श्रीलंकन गोलंदाज पथिराना या महिन्यांच्या सुरुवातीला बांगलादेशविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. या दुखापतीतून तो अद्याप सावरु शकलेला नाही. दुखापतीमुळे पथिराना बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यातही खेळू शकला नव्हता. पथिरानावर सध्या श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या फिजिओकडून उपचार सुरु आहेत. 

पथिरानाची आयपीएल कारकिर्द
आयपीएल 2023 मध्ये मथीशा पथिरानाने चेन्नई सुपर किंग्सच्या जेतेपदात मोलाची भूमिका बजावली होती. पथीरानाने 2022 च्या हंगामात आयपीएलमध्ये पुनरागमन केलं होतं. पण 2023 चा हंगाम त्याच्यासाठी यादगार ठरला. पथिरानाने आयपीएल कारकिर्दीत 14 सामन्यात तब्बल 21 विकेट घेतल्या आहेत. 15 धावांवर 3 विकेट ही त्याची आयपीएलमधली सर्वोत्तम गोलंदाजी आहे. पथिरानाच्या गैरहजेरीत बांगलादेशचा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज मुस्थफिजुर रहमान चेन्नईचा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज असेल. 

चेन्नई सुपर किंग्सचा संघ
 एम.एस.धोनी (कर्णधार), अजय मंडल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, महिश तीक्ष्णा, महिषा पथिराना, मिचेल सँटनर, मोईन अली, मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हंगरगेकर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शेख रशीद, शिवम दुबे, सिमरजित सिंग, तुषार देशपांडे, शार्दुल ठाकूर, रचिन रवींद्र, डेरेल मिशेल, समीर रिझवी, मुस्ताफिझूर रहमान आणि अरावेसी अवनीश

चेन्नई सुपर किंग्सचं वेळापत्रक
चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - 22 मार्च
चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स - 26 मार्च
चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स - 31 मार्च
चेन्नई सुपर किंग्स वि. सनरायजर्स हैदराबाद - 5 एप्रिल