Shubhman Gill Coach for Prithvi Shaw: भारतीय क्रिकेट संघाने 2018 मध्ये अंडर 19 वर्ल्ड-कप (Under 19 World Cup) जिंकला तेव्हा शुभमन गिल (Shubman Gill) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) संघात होते. दोघांनीही एकत्रच आपल्या प्रवासाला सुरुवात केली. पण दोघांना मिळालेल्या यशात मात्र मोठा फरक आहे. एकीकडे शुभमन गिल (Shubhman Gill)) तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा एक भक्कम खेळाडू म्हणून समोर येत आहे. तर दुसरीकडे दुसरीकडे पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) मात्र भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत आहे. यादरम्यान शुभमन गिलच्या बालपणीच्या प्रशिक्षकांनी पृथ्वी शॉला खडे बोल सुनावले आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघाच्या या खेळाडूला आपण स्टार असून कोणीही आपल्याला स्पर्श करु शकत नाही असं वाटत आहे.
"2018 मध्ये दोघेही अंडर-19 विजेत्या संघात होते. बरोबर ना? पण आज पृथ्वी शॉ कुठे आहे आणि शुभमन गिल कुठे आहे? दोघेही वेगवेगळ्या श्रेणीत आहेत," असं करसन घावरी यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हटलं.
"पृथ्वी शॉला वाटतं आपण स्टार आहोत आणि कोणीही आपल्याला हात लावू शकत नाही. पण त्याने हे समजण्याची गरज आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावत तुम्ही टी-20, एकदिवसीय, कसोटी सामना किंवा रणजी ट्रॉफीत जरी खेळत असाल तर बाद होण्यासाठी एक चेंडू भरपूर असतो," अशी टीका त्यांनी केली आहे.
करसन घावरी यांनी शुभमन गिलला 11 वर्षांचा असताना त्याला प्रशिक्षण दिलं होतं. सर्वोच्च स्तरावर तुम्ही चांगली कामगिरी करण्यासाठी शिस्त आणि शांत स्वभाव महत्त्वाचा आहे असं ते म्हणाले आहेत. पृथ्वी शॉ मात्र या दोन्ही गोष्टींसाठी संघर्ष करत आहे. भारतीय संघच नाही तर आयपीएलमध्येही तो सतत वाईट कामगिरी करत असून अपयशी ठरत आहे.
"तुमच्याकडे शिस्त आणि चांगल्या स्वभावाची गरज आहे. तुम्ही सतत स्वत:वर काम करणे आवश्यक आहे. तुम्ही क्रीजवर ताबा मिळवला पाहिजे आणि जर तुम्ही तसे केले तर तुम्हाला अधिक धावा करता येतील," असं ते म्हणाले आहेत.
दरम्यान यावेळी त्यांनी अद्यापही हातातून वेळ गेलेली नाही असं सागताना पृथ्वी शॉने त्याच्या चुकांवर काम केले पाहिजे, मेहनत करत एक भक्कम खेळाडू म्हणून समोर आलं पाहिजे असं आवाहन केलं आहे. "दोघेही समान वयाचे आहेत. अद्यापही सर्व काही संपलेलं नाही. शुभमन गिलने आपल्या कमतरतांवर काम केलं आहे, पण पृथ्वी शॉने नाही. त्याने मेहनत घेण्याची गरज आहे. अन्यथा इतकं कौशल्य असून काही फायदा नाही," असं त्यांनी सांगितलं आहे.
आयपीएलच्या 16 व्या हंगामात पृथ्वी शॉ सहा सामने खेळला. यामध्ये त्याने 12, 7, 0, 15, 0, आणि 13 धावा केल्या. यानंतर त्याला संघातून डच्चू देण्यात आला. अखेरच्या दोन सामन्यात त्याला पुन्हा संघात संधी देण्यात आली होती. यावेळी त्याने एक अर्धशतक ठोकलं. पण यानंतरही तो टीकाकारांना उत्तर देऊ शकला नाही.