IPL 2023 Sixes And Fours: इंडियन प्रिमिअर लीगच्या यंदाच्या पर्वात म्हणजेच आयपीएल 2023 मध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊसच पडत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. अर्थात या फटकेबाजीच्या आतीशबाजीमुळे क्रिकेट चाहते सुखावले आहेत. सोमवारी आयपीएलमधील 53 वा सामना पंजाब किंग्स आणि कोलकाता नाइटरायडर्सच्या संघादरम्यान खेळवण्यात आला. या सामन्यातही चौकार, षटकारांनी चाहत्यांच्या नजरेचं पारणं फेडलं. या सामन्यानंतर या वर्षीच्या आयपीएलमधील षटकारांची संख्या 794 इतकी झाली असून चौकारांची संख्या 1545 पर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या संघांच्या यादीमध्ये कोलकाता नाईटरायडर्स अव्वल स्थानी आहे.
खास बाब म्हणजे एकूण 794 षटकारांपैकी 100 हून अधिक षटकार मारणारा कोलकाता हा एकमेव संघ आहे. कोलकात्याच्या संघाने मारलेल्या षटकारांची संख्या 106 (पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर) इतकी आहे. पंजाब विरुद्धच्या सामन्यात केकेआरच्या फलंदाजांनी 6 षटकार लगावले. पंजाबविरुद्धच्या सामन्यामध्ये केकेआरचा फलंदाज आंद्रे रसेलने 3 षटकार लगावत संघाचा विषय अधिक सोपा केला. रसेलबरोबरच या सामन्यामध्ये केकेआरच्या 3 फलंदाजांनी प्रत्येकी एक षटकार लगावला. या षटकार लगावणाऱ्या खेळाडूंमध्ये रिंकू सिंह, रहमनुल्लाह गुरबाज आणि संघाचा कर्णधार नीतीश राणा यांचा समावेश आहे.
अगदी शेवटच्या चेंडूवर विजय मिळवत केकेआरने सामना 5 विकेट राखून खिशात घातला. या विजयासहीत 10 पॉइण्ट्ससहीत केकेआरचा संघ पॉइण्ट टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या संघांच्या यादीमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. सीएसकेच्या फलंदाजांनी आतापर्यंत एकूण 93 षटकार लगावले आहेत. त्या खालोखाल 89 षटकारांसहीत राजस्थान रॉयल्सचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाब किंग्सचा संघ चौथ्या स्थानी आहे. पंजाबच्या फलंदाजांनी 87 षटकार लगावले आहेत. पाचव्या स्थानी संयुक्तरित्या विराट कोहलीचा बंगळुरु रॉयल चॅलेंजर्स आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघ आहे. या दोन्ही संघांनी आतापर्यंत 83 षटकार लगावले आहेत.
लखनऊ सुपर जायंट्सचा संघ 82 षटकारांसहीत 7 व्या, गुजरात टायटन्स 73 षटकारांसहीत 8 व्या तर सनरायझर्स हैदराबाद 56 षटकारांसहीत 9 व्या स्थानी आहे. एकीकडे कोलकात्याचा संघ सर्वाधिक षटकार लगावणारा संघ ठरला असतानाच दुसरीकडे सर्वात कमी षटकार लगावणारा संघ हा दिल्ली कॅपिटल्सचा आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये केवळ 42 षटकार लगावले आहेत. यापैकी 13 षटकार हे अक्षर पटेलने लगावलेत.
सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या खेळाडूंबद्दल बोलायचं झाल्यास या यादीमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा फलंदाज फाफ ड्युप्लेसी अव्वल स्थानी आहे. त्याने आतापर्यंत 29 षटकार लगावले आहेत. चेन्नईचा शिवम दुबे या यादीमध्ये 24 षटकारांसहीत दुसऱ्या स्थानी आहे. तर बंगळुरुचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल हा 23 षटकारांसहीत तिसऱ्या स्थानी आहे. लखनऊ सुपरजायट्सचा काइल मेयर्स 22 षटकारांसहीत चौथ्या क्रमाकांवर आहे. त्याचबरोबरच पाचव्या स्थानी 3 खेळाडू असून त्यांनी प्रत्येकी 21 षटकार लगावले आहेत. यात सीएसकेचा ऋतुराज गायकवाड, राजस्थान रॉयल्सचा यशस्वी जयस्वाल आणि केकेआरचा रिंकू सिंह यांचा समावेश आहे.