Beed News: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला आहे. वाल्मिक कराडला अटक करण्यात आली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामाच्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी उचलून धरली आहे. सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या तब्बल एक तास चर्चा झाली. तेव्हा धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, या सगळ्या चर्चांवर धनंजय मुंडेंनी स्पष्ट उत्तर दिलं आहे.
धनंजय मुंडे यांनी सोमवारी अजित पवारांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चा सुरू होत्या. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीसाठी धनंजय मुंडे हे मंत्रालयात आले होती. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी मुंडेंची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना तुम्ही राजीनामा दिला आहे का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी बिलकुल नाही, मी राजीनामा दिलेला नाही, असं ठाम स्वरात म्हटलं आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला ईडीने नोटीस बजावली असल्याची सूत्रांची माहिती आहे. याबाबतही मुंडे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी वाल्मीक कराडला ईडीने नोटीस दिली की नाही, याबद्दल मला काहीही कल्पना नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
सोमवारी धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट देऊन बीड प्रकरणातील आपली बाजू स्पष्ट केल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं आहे. विरोधकांनी केलेल्या आरोपावर मुंडेंनी अजित पवारांसमोर खुलासा केला. या सर्व घटनाक्रमाशी आपला काहीही संबंध नसल्याचे मुंडे यांनी अजित पवारांना सांगितलं आहे. बीड प्रकरणात जोपर्यंत पुरावा मिळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई केली जाणार नाही, अशी भूमिका पक्षाने घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. न्यायालयीन चौकशी, एसआयटी व सीआयडी चौकशी होईपर्यंत कारवाई केली जाणार नाही असं सांगण्यात येत आहे. तिन्ही चौकशीमध्ये जो दोषी असेल, त्याच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे. हीच अजित पवारांची सोमवारच्या भेटीगाठींनंतरची भूमिका असल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांबरोबरच्या चर्चेनंतर ही भूमिका घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.