चेन्नई : आयपीएल 2021 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा प्रवास अत्यंत वाईट मार्गाने सुरू झाला आहे. शनिवारी मुंबई इंडियन्सने हैदराबादला या सीझनमधील तिसर्या सामन्यात 13 धावांनी पराभूत केले आहे. सीझनमधील हा हैदराबादचा सलग तिसरा पराभव आहे. या संघाला आतापर्यंत एकही सामना जिंकता आला नाही. मागील सामन्यामध्ये लक्ष्याचा पाठलाग केल्यानंतर हैदराबादने चांगली सुरुवात केली परंतु त्यांनी पुन्हा सामना गमावला. मुंबई विरुद्धही असेच घडले. याची सुरुवात झाली 12 ओव्हरपासून, जो खर्या अर्थाने सामन्याचा टर्नींग पॅाइंट ठरला. त्यावेळी हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर खेळत होता.
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर मुंबईने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक यांनी संघाला मजबूत सुरुवात करुन दिली. हैदराबादला प्रथम रोहितची विकेट मिळाली, त्यानंतर धावांचा वेग थांबला. हैदराबादने मुंबईची मधली फळी नियंत्रणात ठेवली आणि संघाला केवळ 150 धावा करता आल्या. त्यानंतर हैदराबादनेही आपल्या फलंदाजीची शानदार सुरुवात केली. जॉनी बेस्टो आणि डेव्हिड वॉर्नर यांनी आपला शो सुरू केला. त्या दोघांनी मिळून केवळ 7 ओव्हरमध्ये 67 धावा केल्या.
बेस्टोनंतर मनिष पांडेसुद्धा पुढच्याच ओव्हरमध्ये बाद झाला. असे असूनही कर्णधार डेव्हिड वॉर्नर मैदानावर असल्याने हैदराबादची परिस्थिती चांगली होती. वॉर्नरने या काळात काही मोठे शॉट्स गोळा करून संघाच्या आशा कायम राखल्या. पण त्यानंतर 12 व्या ओव्हरमध्ये संपूर्ण परिस्थिती बदलली.
पोलार्डच्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर विराट सिंगने हलक्या हाताने बॅालला मारले आणि वेगाने एक धाव घेतली. वॉर्नर फलंदाजीच्या दिशेने धावत होता, परंतु हार्दिक पांड्याने लगेचच तो बॅाल उचलला आणि त्याचा थेट स्टंपवर थ्रो केला. पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता वॉर्नर पॅव्हेलियनमध्ये परतला.
वॉर्नरच्या या विकेटमुळे हैदराबादचे संपूर्ण भाग्य उलटले. त्यावेळी हैदराबादचा स्कोअर 90 धावा होता. त्यानंतर हैदराबादचे विकेट्स पडू लागले. हैदराबादची पुढचे 7 विकेट फक्त 47 धावांवर पडले आणि विजयाची स्थितीत असूनही संघाने ही मॅच 13 धावांवर गमावली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यातही हैदराबादवर अशीच परिस्थिती उद्भवली होती. त्या सामन्यातही हैदराबादने 17 व्या ओव्हरमध्ये 3 गडी गमावले आणि सामना उलटला. त्यावेळेस हैदराबादचा 6 धावांनी पराभव झाला. या दृष्टीने, हैदराबादला आगामी सामन्यात सुधार करावे लागतील.