मुंबई: IPLच्या चौदाव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू नुकताच पहिला सामना झाला. या सामन्यात कोहलीच्या संघानं विजय खेचून आणला आहे. तर मुंबई इंडियन्सने पहिला सामना गमवण्याची परंपरा कायम राखली.
आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स सामना रंगणार आहे. गुरू महेंद्र सिंह धोनी आणि शिष्य ऋषभ पंत असा गुरू शिष्य सामना रंगणार आहे. CSK विरुद्ध DC सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे.
धोनीच्या संघामध्ये युवा कमी आणि अनुभवी खेळाडू जास्त आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सकडे जोश आहे. दोन्ही संघांमध्ये दक्षिण आफ्रिकेहून आलेले खेळाडू खेळू शकणार नाहीत. त्यांना 7 दिवसांचा क्वारंटाइन वेळ पूर्ण करायचा असल्यानं त्यांना पहिला सामना खेळता येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अक्षर पटेलनं जरी कोरोनावर मात केली असली तर तो पहिला सामना खेळण्याची शक्यता धुसर असल्याचं सांगितलं जात आहे.
IPLच्या मैदानात आतापर्यंत दोन्ही संघ 23 वेळा आमनेसामने आले आहेत. मात्र पहिल्यांदाच दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व ऋषभ पंतकडे असल्याने आता गुरु आणि शिष्य एकमेकांविरुद्ध खेळताना पाहायला मिळणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.