मुंबई: महेंद्र सिंह धोनीच्या संघातील स्टार खेळाडू राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजस्थान रॉयल्स संघातील खेळाडू काही दुखापतीनं तर काही कोरोनाला घाबरून संघातून बाहेर गेले आहेत. त्यामुळे आता राजस्थान संघाकडे खेळाडूंची कमतरता असल्याचं दिसत आहे. त्यामुळे राजस्थानवर कोरोनाच नाही तर संघातील खेळाडूंच्या तुटवड्यानं दुसरं संकट कोसळलं आहे.
राजस्थान संघातील गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि फलंदाज बेन स्टोक्स या दोघांनाही दुखापत झाली. ही दुखापत गंभीर असल्याने दोन्ही खेळाडू IPLमधून बाहेर पडले आहेत. लियाम लिविंगस्टोन कोरोनामुळे राहाव्या लागणाऱ्या बायो बबलला वैतागून IPLसोडून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता राजस्थान संघात केवळ 4 परदेशी खेळाडू उरले आहेत.
राजस्थान रॉयल्स फ्रांचायझीने अनेक संघाशी संपर्क केला आहे. राजस्थान संघाने रॉबिन उथप्पाला आपल्या संघात समाविष्ट करून घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत झालेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्स संघाकडून रॉबिन उथप्पाने एकही सामना खेळलेला नाही.
रॉबिन उथप्पा गेल्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. फ्रांचायझीने त्याला IPLनंतर रिलीज केलं. यावर्षी रॉबिनला चेन्नई संघात घेतलं मात्र त्याला खेळण्याची अद्याप संधी दिली नाही. आता महेंद्रसिंह धोनी आणि फ्रांचायझी रॉबिन उथप्पाला राजस्थानकडे सोडणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.