IPL 2020: शतक ठोकण्यापूर्वी घाबरला होता केएल राहुल, मॅचनंतर खुलासा

मैदानावर उतरण्याधी घाबरला होता केएल राहुल, पण तरीही ठोकले शतक

Updated: Sep 25, 2020, 03:20 PM IST
IPL 2020: शतक ठोकण्यापूर्वी घाबरला होता केएल राहुल, मॅचनंतर खुलासा title=

दुबई : इंडियन प्रीमियर लीग २०२० (आयपीएल) मध्ये भारतीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केएल राहुलने नोंदविला आहे. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्धच्या सामन्यापूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या कर्णधाराने म्हटलं होतं की, त्याला फलंदाजीबद्दल फारसा आत्मविश्वास नव्हता.

राहुलने नाबाद १३२ धावा केल्या. किंग्ज इलेव्हन पंजाबने ३ विकेट गमवत २०६ धावा केल्या आणि आरसीबी संघ १७ ओव्हरमध्ये फक्त १०९ रन करु शकला. बंगळुरुचा ९७ धावांनी पराभव झाला. राहुलने मात्र या विजयाचे श्रेय संपूर्ण संघाला दिले.

आपल्या शानदार खेळीसाठी 'सामनावीर' ठरलेल्या राहुलने म्हटलं की, 'ही संघाची संपूर्ण कामगिरी होती, त्यामुळे मी आनंदी आहे. वास्तविक माझ्या फलंदाजीबद्दल मला विश्वास नव्हता. काल मी मॅक्सी (ग्लेन मॅक्सवेल) शी बोललो आणि मी म्हणालो की माझं फलंदाजीवर पूर्ण नियंत्रण येत नाही. तो म्हणाला की तू विनोद करतोस. तू खूप चांगला खेळत आहेस.'

तो म्हणाला, 'सुरुवातीला मी थोडा चिंताग्रस्त होतो पण काही बॉल्स खेळल्यानंतर मी चांगला खेळेल हे मला ठाऊक होते. कर्णधार असूनही मी जुन्या पद्धतीनेच खेळतो. टॉस होईपर्यंत मला स्वत: बद्दल मी एक कप्तान नाही असे वाटते. मी खेळाडू आणि कर्णधार यांच्यात समतोल राखण्याचा प्रयत्न करतो.' राहुलने त्याच्या गोलंदाजांची, विशेषत: युवा लेगस्पिनर रवी बिश्नोईची प्रशंसा केली.

तो म्हणाला की, 'मी त्याला अंडर -१९ वर्ल्ड कपमध्ये पाहिले होते. तो हार मानत नाही आणि जेव्हा जेव्हा त्याच्याकडे चेंडू असतो तो तयार असतो. तो अ‍ॅरॉन फिंच आणि एबी (डिव्हिलियर्स) गोलंदाजीवर किंचित घाबरला होता पण त्याने हिम्मत दाखवली.'

कोहली म्हणाला, 'आम्ही मधल्या षटकांत चांगली गोलंदाजी केली. त्यांनी चांगली सुरुवात केली आणि आम्ही चांगले पुनरागमन केले. मी याची जबाबदारी घेतो. आजचा दिवस माझ्यासाठी चांगला नव्हता. केएल (राहुल) चे दोन कॅच सुटल्यानंतप आम्ही 35-40 गमावले. जर आम्ही त्यांना 180 धावांवर रोखलं असतं तर पहिल्याच चेंडूपासून आमच्यावर दबाव आला नसता.'