मुंबई : भारताचा दिग्गज लेग स्पिनर अनिल कुंबळेला आयपीएलमध्ये मोठी जबाबदारी मिळाली आहे. किंग्स इलेव्हन पंजाबच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेची नियुक्ती झाली आहे. अनिल कुंबळे आयपीएलच्या एखाद्या टीमचा एकमेव भारतीय मुख्य प्रशिक्षक आहे. किंग्स इलेव्हन पंजाब ही आयपीएलमधली तिसरी टीम आहे ज्याच्यासोबत अनिल कुंबळे जोडला गेला आहे.
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार अनिल कुंबळेला पंजाबच्या टीमने प्रशिक्षकासोबतच अनेक अधिकारही दिले आहेत. टीमच्या क्रिकेट संबंधी सगळ्या निर्णयाचा प्रमुख म्हणूनही कुंबळेवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये भविष्यातील योजनांचाही समावेश आहे. १९ ऑक्टोबरला कुंबळेने पंजाबच्या टीम प्रशासनाला प्रेझेंटेशन दिलं होतं.
अनिल कुंबळे पंजाबच्या टीममध्ये माईक हेसनची जबाबदारी सांभाळेल. न्यूझीलंडच्या माईक हेसनसोबत पंजाबच्या टीमने २ वर्षांचा करार केला होता. पण हा करार माईक हेसन यांनी अर्ध्यातच सोडला. हेसन आता बंगळुरूच्या टीमशी जोडले गेले आहेत.
२००८मध्ये अनिल कुंबळे बंगळुरूच्या टीममध्ये खेळाडू होता. यानंतर त्याने बंगळुरूच्या टीमचं नेतृत्वही केलं. २०१३ पर्यंत कुंबळे बंगळुरूच्या टीमचा सल्लागारही होता. यानंतर कुंबळे मुंबईच्या टीमचाही सल्लागार झाला.