IPL 2019: आयपीएलच्या फायनलची तारीख ठरली, या मैदानात होणार सामना

आयपीएलच्या १२व्या मोसमाच्या फायनलची तारीख अखेर ठरली आहे.

Updated: Apr 22, 2019, 08:14 PM IST
IPL 2019: आयपीएलच्या फायनलची तारीख ठरली, या मैदानात होणार सामना title=

मुंबई : आयपीएलच्या १२व्या मोसमाच्या फायनलची तारीख अखेर ठरली आहे. १२ मे रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये यंदाच्या आयपीएलची फायनल रंगेल. याआधीच्या वेळापत्रकानुसार क्वालिफायर-१ आणि फायनल ही चेन्नईमध्ये होणार होती. पण तामीळनाडू क्रिकेट असोसिएशन (टीएनसीए)ला सरकारने स्टेडियममधले बंद असलेले तीन स्टॅण्ड सुरु करण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे आता फायनल हैदराबादमध्ये होणार आहे.

आता चेन्नईमध्ये ७ मे रोजीचा क्वालिफायर-१ चा सामना होईल, तर एलिमिनेटर आणि क्वालिफायर-२ चे सामने विशाखापट्टणमच्या मैदानात होतील. एलिमिनेटरची मॅच ८ मे रोजी आणि क्वालिफायर-२ची मॅच १० मे रोजी होणार आहे.

आयपीएलच्या नियमांनुसार आधीच्या मोसमात जिंकलेल्या टीमच्या घरच्या मैदानात पुढच्या मोसमातली फायनल होते. तर प्ले ऑफचे उरलेले सामने मागच्या वर्षीच्या उपविजेत्या टीमच्या घरच्या मैदानात होतात, पण यावेळी मात्र फायनलमध्ये बदल करण्यात आले आहेत.

तर पहिलीच 'मिनी वूमन आयपीएल' जयपूरमध्ये ६ मे ते १० मेपर्यंत खेळवली जाईल. ट्रायलब्लेझर्स, सुपरनोव्हास आणि व्हिलॉसिटी या तीन टीम महिलांच्या आयपीएलमध्ये सहभागी होतील.