नवी दिल्ली : आयसीसीने १ ऑक्टोबरपासून क्रिकेटचे नवे नियम लागू केले आहेत. या नियमांपैकी एक नियम होता 'फेक फिल्डिंग'चा. या नियमावर वाद सुद्धा झाला होता.
भारत-श्रीलंका टेस्ट मॅचमध्येही तिसऱ्या दिवशी 'फेक फिल्डिंग' झाल्याचं पहायला मिळालं. ५३व्या ओव्हरमध्ये श्रीलंकन टीमचा कॅप्टन 'फेक फिल्डिंग' करत असल्याचं दिसून आलं. मात्र, त्याच्यावर पेनल्टी लावण्यात आली नाही.
श्रीलंकन टीमच्या कॅप्टनने केलेली 'फेक फिल्डिंग' अंपायरच्या लक्षात आलीच नाही. श्रीलंकन टीमची ही 'फेक फिल्डिंग' पकडली गेली असती तर टीम इंडियाला पाच रन्सचा फायदा झाला असता.
५३व्या ओव्हरचा चौथा बॉल शनाकाने भुवनेश्वर कुमारला टाकला. भुवनेश्वर कुमारने हा बॉल बॅकफुटवर जात खेळला. हा बॉल पकडण्यासाठी श्रीलंकन कॅप्टन चंडीमल धावला आणि मग थ्रो करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या हातात बॉलच नव्हता. तरिही त्याने थ्रो केला. नव्या नियमानुसार हा प्रकार 'फेक फिल्डिंग'मध्ये येतो.
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने हा सर्व प्रकार पाहिला. मात्र, मैदानात उपस्थित असलेल्या अंपायरच्या हा प्रकार लक्षातच आला नाही. त्यामुळे चंडीमल यापासून वाचला.