'विराट' खेळी व्यर्थ; ऑस्ट्रेलियाकडून भारताचा ३२ धावांनी पराभव

३१४ रनचे आव्हान पार करताना भारतीय फलंदाजांची चांगलीच दमछाक झाली. 

Updated: Mar 9, 2019, 03:42 PM IST
'विराट' खेळी व्यर्थ; ऑस्ट्रेलियाकडून भारताचा ३२ धावांनी पराभव  title=

रांची :  भारताचा तिसऱ्या वनडे मॅचमध्ये ३२ रन्सने पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी ३१४ रन्सचे आव्हान दिले होते. या मोबदल्यात भारताने सर्वबाद २८१ रन्स केल्या. भारताला पूर्ण ५० ओव्हर देखील खेळता आले नाही. भारताचा डाव ४८.२ ओव्हरमध्ये आटोपला. भारताच्या या पराभवामुळे ५ मॅचच्या सीरिजमध्ये २-१ अशी स्थिती झाली आहे. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक १२३ रन्सची खेळी केली. पण इतर खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताचा पराभव झाला. यामुळे कोहलीची शतकी खेळी देखील व्यर्थ गेली.    

ऑस्ट्रलियाने ५० ओव्हरमध्ये ३१३ रन्स केल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी ३१४ रन्सची गरज होती. या आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या भारताची सुरुवात निराशाजनक झाली. भारताने पहिले तीन विकेट २७ रन्सवर गमावले. भारताचा पहिला विकेट ११ रन्सवर गेला. शिखर धवन अवघी १ रन करुन माघारी परतला. यानंतर काही वेळाने रोहित शर्मा १४ रन करुन तंबूत परतला. रोहित आऊट झाल्यानंतर आलेला रायुडू देखील २ रनवर आऊट झाला.

एका बाजूला विकेट जात असताना कॅप्टन कोहली एकाकी लढत होता. रायुडू आऊट झाल्यानंतर आलेल्या धोनीने कोहलीला चांगली साथ  दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ५९ रन्सची पार्टनरशीप झाली. धोनीला चांगली सुरुवात मिळाली होती. पण या खेळीचा त्याला मोठ्या खेळीत बदल करता आला नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धची तिसरी मॅच ही रांचीत होती. रांची धोनीचे होम ग्राउंड असल्याने त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती.पण धोनीने चाहत्यांची निराशा केली. धोनी २६ रन्स करुन आऊट झाला.

धोनी आऊट झाल्यानंतर केदार जाधव मैदानात आला होता. केदार जाधवने देखील कोहलीला चांगली साथ दिली. पाचव्या विकेटासाठी कोहली-केदारमध्ये ८८ रन्सची  भागीदारी झाली. पण यानंतर केदार देखील  २६ रन करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. केदारनंतर विजय शंकरने देखील ३२ रन करत कोहलीला साथ दिली. पण अखेरपर्यंत कोहलीला कोणालाच चांगली साथ देता आली नाही. कोहली देखील १२३ रन्स करुन आऊट झाला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स, झाय रिचर्डसन आणि एडम झॅम्पा या तिकडीने प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. तर नॅथन लॉयनने १ विकेट घेतली.

यापूर्वी टॉस जिंकून भारताने ऑस्ट्रेलियाला बॅटिंग करण्यास भाग पाडले. कॅप्टन एरॉन फिंच या दोघांनी ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात मिळवून दिली. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी तब्बल १९३ रन्सची पार्टनरशीप झाली. या जोडीला तोडण्यास कुलदीप यादवला यश आले. त्याने एरॉन फिंचला शतकापासून रोखले. फिंचला कुलदीपने ९३ रन्सवर आऊट केले. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने सर्वाधिक १०४ रन्सची शतकी खेळी केली. वनडेतील ही त्याची पहीलीच शतकी खेळी होती. ग्लेन मॅक्सवेलने देखील ४७ रन्सची चांगली खेळी केली. ख्वाजाच्या शतकाच्या जोरावर,  आणि फिंचच्या अर्धशतकी खेळीवर ऑस्ट्रेलियाने ५० ओव्हरमध्ये ५ विकेटच्या मोबदल्यात ३१३ रन्स केल्या. भारताकडून ३ विकेट कुलदीपने घेतल्या.

या सीरिजमधील चौथी मॅच ही १० मार्चला मोहाली येथे खेळली जाणार आहे.