पाकिस्तानचं 'पीएसएल'चं आमंत्रण बीसीसीआयनं फेटाळलं

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं पाठवलेलं आमंत्रण बीसीसीआयनं फेटाळून लावलं आहे

Updated: Mar 8, 2019, 09:28 AM IST
पाकिस्तानचं 'पीएसएल'चं आमंत्रण बीसीसीआयनं फेटाळलं title=

लाहोर : पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं पाठवलेलं आमंत्रण बीसीसीआयनं फेटाळून लावलं आहे, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी दिली आहे. १७ मार्चला होणाऱ्या पीएसएल फायनलसाठी पाकिस्तानमध्ये यायचं आमंत्रण पीसीबीनं आयसीसी आणि आयसीसीशी संलग्न असलेल्या सगळ्या संस्थांना पाठवलं होतं. पण भारतीय असलेले आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर आणि बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी.के.खन्ना यांनी वैयक्तिक कारण देत, या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नसल्याचं सांगितलं, असं एहसान मणी म्हणाले.

आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन हे पीएसएलच्या कराचीमध्ये होणाऱ्या फायनलला उपस्थित असतील, अशी प्रतिक्रिया एहसान मणी यांनी दिली.

पीएसएलच्या फायनलसाठी भारत, इंग्लंड, आयर्लंड, बांगलादेश, झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाला आमंत्रण देण्यात आलं होतं. फायनलसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं केलेलं आयोजन आणि सुरक्षेबद्दल जगात संदेश जावा आणि पाकिस्तानबद्दलचं मत बदलावं, अशी हे आमंत्रण पाठवण्यामागची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची भूमिका होती.

जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधले संबंध आणखी खराब झाले. पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यात भारताचे ४० पेक्षा जास्त जवान शहीद झाले. पण पुलवामा हल्ल्याआधीच आम्ही पीएसएलचं आमंत्रण पाठवल्याचं पीसीबीच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पीएसएल फायनलसाठी येणार आहेत का? असा सवाल एहसान मणींना विचारण्यात आला. पण त्यांनी यावर उत्तर देणं टाळलं.

पीएसएलच्या फायनल पकडून ८ मॅच या कराचीच्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. यासाठी स्टेडियममध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. सुरुवातीला ३ मॅच लाहोरमध्ये आणि ५ मॅच कराचीमध्ये खेळवण्यात येणार होत्या. पण लाहोर एअरस्पेस बंद असल्यामुळे सगळे सामने कराचीमध्ये खेळवण्यात येणार आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला. यानंतर पाकिस्तान वायुदलानं भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केला होता. यामुळे भारत-पाकिस्तान सीमेवरचा तणाव वाढला. यामुळे लाहोर एअरस्पेस बंद करण्यात आला.