साऊथम्पटन : टीम इंडिया वर्ल्डकप २०१९ मधील आपली पहिली मॅच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमधील ही ८ वी मॅच आहे. वर्ल्ड कपची ही १२ वी स्पर्धा आहे. टीम इंडियाने वर्ल्डकपमधील पहिली मॅच जेव्हा जिंकली आहे, तेव्हा टीम इंडियाने त्या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे.
टीम इंडियाने आतापर्यंत एकूण ५ वर्ल्ड कपमधील पहिल्या मॅच जिंकण्यास यश मिळवलं. टीम इंडियाने १९८३, १९९६, २००३, २०११ आणि २०१५ च्या वर्ल्ड कपमधील पहिली मॅच जिंकून विजयी सलामी दिली होती.
वर्ल्ड कप स्पर्धेला १९७५ साली सुरुवात झाली. टीम इंडियाने वर्ल्ड कपची तिसरी स्पर्धा कपिल देव यांच्या नेतृत्वात जिंकली होती. टीम इंडियाने १९८३ च्या वर्ल्ड कपमधील पहिली मॅचदेखील जिंकली होती.
टीम इंडियाने १९९६ च्या वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनल मध्ये धडक मारली होती. या वेळेस देखील टीम इंडियाने पहिली मॅच जिंकली होती.
टीम इंडियाने २००३ च्या वर्ल्डकपमध्ये केनियाला पराभूत करुन फायनलमध्ये धडक मारली होती. या वेळेस देखील टीम इंडियाने या स्पर्धेतील पहिली मॅच जिंकली होती.
टीम इंडियावर २००७ च्या वर्ल्डकप मध्ये साखळी फेरीत बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली होती. ३ पैकी २ मॅचमध्ये इंडियाचा पराभव झाला होता. यात दुबळ्या बांगलादेश आणि श्रीलंकेने इंडियाला पराभूत केले होते.
टीम इंडियाने १९८३ नंतर २०११ ला वर्ल्डकप जिंकला होता. म्हणजेच टीम इंडियाला २८ वर्षांनंतर विजयी होता आले. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने धमाल कामगिरी केली होती. तसेच टीम इंडियाने या वर्ल्डकपची विजयी सुरुवात केली होती.
गत वर्ल्ड कपमधील स्पर्धेत टीम इंडियाने पहिल्याच मॅचमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला होता. या मॅचमध्ये विराटने शतकी कामगिरी केली होती. या वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने सेमीफायनल पर्यंत मजल मारली होती.
त्यामुळे जेव्हा टीम इंडियाने वर्ल्ड कपमधील पहिली मॅच जिंकली तेव्हा तेव्हा टीम इंडियाने चांगलीच कामगिरी केल्याचे दिसून येते. त्यामुळे आजच्या सामन्यात (५ जून) दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन टीम इंडिया विजयी सलामी देणार का याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.