मुंबई : पाकिस्तानच्या संघाने 2021च्या T-20 विश्वचषक स्पर्धेत सलग तिसरा सामना जिंकलाय. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर 5 विकेट्सने मात केलीये. या विजयासह पाकिस्तानने उपांत्य फेरीत जवळपास मजल मारली असून हा संघ दुसऱ्या गटातही पहिल्या स्थानावर राहील. दुसरीकडे, भारत आणि न्यूझीलंड दुसऱ्या स्थानासाठी प्रबळ दावेदार आहेत.
रविवारी भारत विरूद्ध न्यूझीलंड या दोन संघांमध्ये सामना होणार असून यात कोणता संघ विजयी होईल, याचा उपांत्य फेरी गाठणं जवळपास निश्चित होणार आहे. जर पाकिस्तानचा संघ अफगाणिस्तानविरुद्ध हरला असता तर भारतासाठी उपांत्य फेरीत जाणं कठीण होतं. तर आता दुसऱ्या गटात भारतासाठी काय समीकरणं आहेत हे पाहूयात.
दुसऱ्या गटात भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड हेच मोठे संघ आहेत. अशा परिस्थितीत, हे तिन्ही संघ इतर तीन संघ अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्धचे सर्व सामने जिंकतील असं गृहीत धरलं तर या आधारावर खालील प्रकारे परिस्थिती असू शकते.
जर टीम इंडियाने न्यूझीलंडला हरवलं तर पाकिस्तान संघाचे 10 गुण होतील आणि ते दुसऱ्या गटात पहिल्या स्थानावर असतील. त्याचबरोबर भारत आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर असेल. न्यूझीलंडचे सहा गुण होतील. अशा स्थितीत पाकिस्तान आणि भारताचा संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. या स्थितीत भारताचा सामना गट 1 मध्ये अव्वल संघाशी होणार आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया गट 1 मध्ये अव्वल स्थानासाठी दावेदार आहेत.
न्यूझीलंडने भारताला हरवल्यास पाकिस्तानच्या स्थितीत कोणताही बदल होणार नाही. हा संघ 10 गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचेल आणि पहिल्या गटातील दुसऱ्या संघाशी सामना करेल. दुसरीकडे भारताचे सहा गुण असतील आणि उपांत्य फेरी गाठू शकणार नाहीत. तर न्यूझीलंडचे आठ गुण असतील आणि हा संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.
आता भारताचा सामना 31 ऑक्टोबरला न्यूझीलंड, 3 नोव्हेंबरला अफगाणिस्तान, 5 नोव्हेंबरला स्कॉटलंड आणि 8 नोव्हेंबरला नामिबियाशी होणार आहे. भारतासाठी सर्वात कठीण सामना न्यूझीलंडविरुद्ध आहे. टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडला कधीही हरवता आलेलं नाही. मात्र, गेल्या पाच वर्षांत भारताचा विक्रम या संघाविरुद्ध खूपच सरस ठरला आहे.