मुंबई : टेबल टेनिसपटू भाविना पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत इतिहास घडवला आहे. भाविनाने टोक्यो पॅरालिम्पिकच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय. सेमीफायनलमध्ये भाविनाने चीनच्या झँग मियाओला पराभूत केलंय. आणि सेमीफायनलच्या विजयानंतर तिने थेट फायनलमध्ये धडक मारली आहे. यामुळे भारताचं सिल्वर मेडल पक्क झालं आहे.
फायलनच्या फेरीत पोहचणारी भाविना पहिली भारतीय टेबल टेनिसपटू ठरली आहे. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भाविनाने सर्बियाच्या बोरिस्लाव्हा पॅरिच रँकोव्हिच हिचा सरळ सेटमध्ये पराभव केला होता. तर आता 34 वर्षीय भाविनाने चीनच्या झँग मियाओला 3-2 असं सरळ सेटमध्ये पराभूत केलं. यामध्ये 7-11, 11-7, 11-4, 9-11, 11-8 ने भाविनाने उपांत्य सामना जिंकला.
भाविना पटेलने टेबल टेनिस महिला एकेरी वर्ग 4 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यामुळे भारताचं सिल्वर मेडल निश्चित झाले आहे. फायनलचा सामना उद्या म्हणजे रविवारी खेळवण्यात येणार आहे.भारतीय वेळेनुसार सकाळी साडेसात वाजता चीनच्या झोउ यिंगशी गोल्ड मेडलसाठी ही स्पर्धा असेल.
मुख्य म्हणजे आतापर्यंत कोणत्याही भारतीय महिला खेळाडूला पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावता आलेलं नाही. त्यामुळेच भारतातील पहिली गोल्डन गर्ल होण्याची संधी भाविनाकडे आहे. त्यामुळे आता भाविना इतिहास घडवणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.