भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर युवराज सिंगचे (Yuvraj Singh) वडील योगराज सिंग (Yograj Singh) जेव्हा क्रिकेटमध्ये सक्रीय होते तेव्हा उत्तम खेळाडूंमध्ये त्यांची गणना होत होती. पण क्रिकेटर म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ते फार मोठं नाव कमावू शकले नाहीत. मात्र त्यांनी आपला मुलगा युवराज सिंगला प्रशिक्षण देत वर्ल्ड चॅम्पिअन खेळाडू बनवलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने योगराज सिंग यांच्याकडे प्रशिक्षण घेतलं आहे. योगराज सिंग यांची स्वत:ची अकॅडमी आहे. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. याा व्हिडीओंमधून योगराज सिंग एक शिस्तबद्ध टास्क मास्टर होण्यासाठी काय करावं लागतं हे सांगितलं आहे. योगराज सिंग आपला कडक स्वभाव आणि कठोर प्रशिक्षणासाठी ओळखले जातात. युवराज सिंग याने अनेकदा याबद्दल जाहीरपणे सांगितलं आहे. नुकतंच योगराज सिंग यांना याबद्दल विचारण्यात आलं.
जर एखाद्याला तुमच्या अकॅडमीत प्रवेश घ्यायचा असेल तर त्या मुलाने नेमकी काय मानसिकता ठेवायला हवी? असा प्रश्न योगराज सिंग यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, "सर्वात प्रथम म्हणजे मृत्यूची भिती संपायला हवी. जेव्हा मी तीन वर्षांचा होतो, तेव्हा माझ्या वडिलांनी आईला मला वाघाच्या शिकारीसाठी घेऊन जात असल्याचं सांगितलं होतं. माझी आई घाबरली होती. त्यावर माझे वडील म्हणाले होते, तो मेला तरी काही फरक पडणार नाही. पण मी त्याला वाघ बनवेन'. तो तीन वर्षांचा मुलगा आपल्या आईसह जंगलात बसला होता. वडील हातात रायफल घेऊन चंद्राच्या प्रकाशात उभे होते. आम्ही मचानवर बसलो होतो. त्याचवेळी वाघ आला, मी ओरडणार होतो पण आईने तोंड दाबलं. यानंतर माझ्या वडिलांनी सहा फुटावरुन वाघाची शिकार केली. डोक्यात गोळी घालून त्यांनी वाघाला ठार केलं. तो एका पर्वताप्रमाणे खाली कोसळला". स्विचला दिलेल्या मुलाखतीत योगराज सिंग यांनी हा किस्सा सांगितला.
"तो लहान मुलगा तेव्हा निशब्द होता. माझ्या वडिलांनी आईला मला खाली आणायला सांगितले. मला पकडून ते म्हणाले, वाघाचा बछडा कधी गवत खात नाही. तो आवाज माझ्या कानात घुमू लागला होता. यानंतर त्यांनी मला वाघावर बसायला लावलं आणि त्याचं रक्त ओठ आणि कपाळावर लावलं. माझ्या घरात अजूनही तो फोटो आहे," असा खुलासा योगराज सिंग यांनी केला.
माझी अकॅडमी अशीच आहे. मी युवराजला तसंच भितीमुक्त तयार केलं आहे असंही ते म्हणाले. युवराज सिंग भारतीय क्रिकेट संघासाठी एक कसोटी आणि सहा एकदिवसीय सामने खेळले आहेत.