भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडूंचा जेव्हा कधी उल्लेख केला जातो तेव्हा त्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे नाव घेतले नाही तर विशेषच. बुमराहच्या निमित्ताने भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय दर्जाचा गोलंदाज मिळाला आहे ज्याने अनेक रेकॉर्ड्स रचले आहेत. बुमराहकडे जे कौशल्य आहे ते जपण्याची आणि त्याची योग्य काळजी घेण्याची गरज आहे कारण भविष्यात असे अनेक वेगवान गोलंदाज यामुळे निर्माण होतील. बीसीसीआय त्यादृष्टीने काळजी घेत असून त्याच्यावर जास्त वर्कलोड येणार नाही यासाठी त्याला तुलनेने कमी महत्त्वाच्या मलिकांमधून विश्रांती दिली जात आहे. बुमराहच्या वाट्याला आज जे काही यश आहे त्यासाठी त्याने फार मेहनत घेतली असून नुकत्याच जिंकलेल्या टी २० वर्ल्ड कपमधे त्याचा मोलाचा वाटा आहे. एक गोलंदाजी संपूर्ण सामन्याचे चित्र बदलण्यात सक्षम आहे हे त्याने दाखवून दिले आहे. 2016 मध्ये भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केल्यानंतर, जसप्रीत बुमराह आता संघाचा महत्त्वपूर्ण सदस्य बनला आहे.
बुमराहने भारतीय संघात पदार्पण केले तेव्हा महेंद्र सिंह धोनी कर्णधार होता. नुकतेच इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत बुमराहने कशाप्रकारे धोनीने आपल्याला मदत केली याचा खुलासा केला. ‘धोनीने मला फार सुरक्षित भावना दिली. संघात आल्यानंतर त्याने लगेच मला सुरक्षित वाटू दिले. त्याला त्याच्या इन्स्टिक्ट वर फार विश्वास आहे. त्याला प्लॅनिंग करणे पटत नाही,’ असा खुलासा बुमराहने केला.
धोनी पायउतार झाल्यानंतर विराट कोहलीकडे नेतृत्व सोपविण्यात आले होते. रोहित शर्मा कर्णधार होण्यापूर्वी विराट कोहलीने सर्व प्रकारात भारतीय संघाचे नेतृत्व केले. विराट कोहलीबद्दल बोलताना बुमराहने सांगितले की, ‘तो प्रचंड उत्साही, ऊर्जेने भरलेला आहे. तो मनात काही ठेवत नाही. त्याने फिटनेसला प्राधान्य दिले आणि त्याप्रकारे संघ तयार केला. आता विराट कोहली कर्णधारपदी नसला तरी तो लीडर आहे. कर्णधार हे फक्त एक पद आहे, पण संघ 11 खेळाडू चालवतात’.
बुमराहन आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली कसोटी आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खेळत आहे. तर काही महिन्यांपूर्वी सूर्यकुमार यादवला भारताचा T20I कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
"फलंदाज असूनही गोलंदाजांप्रती सहानुभूती बाळगणाऱ्या मोजक्या कर्णधारांपैकी रोहित (शर्मा) एक आहे. त्याला खेळाडूंच्या भावना कळतात, आणि खेळाडू कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे त्याला ठाऊक आहे. रोहित कठोर नाही, तो अभिप्रायासाठी तयार असतो," असे त्याने सांगितले.
धोनीने 2020 मध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम दिला. दुसरीकडे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी विश्वचषक विजयानंतर T20 मधून निवृत्ती घेतली आहे.