आजीबाईंची अफलातून गोलंदाजी पाहून बुमराह म्हणतो...

त्याचा अनोखा अंदाज आणि....

Updated: Jul 14, 2019, 01:10 PM IST
आजीबाईंची अफलातून गोलंदाजी पाहून बुमराह म्हणतो...  title=

मुंबई : यंदाच्या क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाचं पारडं सुरुवातीपासून जड होतं. पण शेवटच्या सत्रात मात्र संघ डगमगला आणि विश्वविजेता होण्याचं स्वप्न भंगलं. असं असलं तरीही संघातील काही खेळाडूंच्या कामगिरीला मात्र क्रीडा रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यातील एक नाव म्हणजे जसप्रीत बुमराह. 

दमदार कामगिरी करत अफलातून गोलंदाजीचा मारा करणाऱ्या जसप्रीतच्या चेंडूवर अनेक संघांतील खेळाडू बाद झाले. एक गोलंदाज म्हणून त्याचा अनोखा अंदाज आणि शैली कायमच आकर्षणाचा विषय ठरली आहे. अशा या खेळाडूप्रमाणे गोलंदाजी करण्याचा अनेकांनीच प्रयत्न केला. ज्यामध्ये चक्क एका आजीबाईंचाही समावेश आहे. 

सोशल मीडियावर या आजींचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. ज्यामध्ये त्या बुमराहप्रमाणे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याची नक्कल करत हुबेहुब त्याच्याचप्रमाणे गोलंदाजीसाठी धावणाऱ्या या आजी नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणत आहेत. 

खुद्द जसप्रीत बुमराह यानेसुद्धा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही आजच्या दिवसातील एक सर्वाधिक चांगली गोष्ट आहे.... असं म्हणत त्याने या आजीबाईंची दाद दिली. बुमराहची गोलंदाजीची शैली आणि त्याच आधारे या आजीबाईंनी केलेली नक्कल पाहता, वयाचा आकडा दूर सारत निव्वळ  खेळाचाच आनंद त्या घेत असल्याचं स्पष्ट होत आहे.