मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडीज विरूद्ध वनडे सामन्याच्या सीरीजला उद्या 22 जूलैपासून सुरुवात होणार आहे. या वनडे सामन्याआधीच टीम इंडियाचा विजय निश्चित मानला जात आहे. कारण वेस्ट इंडिज संघाची ही कमजोर बाजू समोर आली आहे. त्यामुळे टीम इंडिया विजयाच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.
भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी सांगितले की, शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिज संघ उत्कृष्ट कामगिरी करेल. 'आम्ही पूर्ण 50 ओव्हर्स कशी फलंदाजी करतो ही महत्त्वाची गोष्ट आहे. डावाची मांडणी करून आणि भागीदारी खेळून आम्हाला पूर्ण 50 ओव्हर्स फलंदाजी करायची आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
सिमन्स पुढे म्हणाले की, 'गोलंदाजी आणि फिल्डींगमध्ये सातत्याने सुधारणा होत आहे. आम्ही आमचा संघ फिल्डींगमध्ये अव्वल मानतो. आमचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करत आहेत. त्यांना धावा रोखणे आणि विकेट्स घेण्यावर भर द्यावा लागेल. असे केल्यानेच प्रतिस्पर्धी संघाला कमी धावसंख्येवर बाद करून आम्ही विजयाची नोंद करू शकतो.
'या' कमजोरीचा टीम इंडियाला फायदा
वेस्ट इंडीजचा संघ गेल्या दोन वर्षांपासून एकदिवसीय सामन्यांमध्ये संपुर्ण 50 ओव्हर्स खेळण्यास संघर्ष करतोय. वेस्ट इंडिजची आकडेवारी पाहिल्यास वर्ल्डकप 2019 नंतर वेस्ट इंडिजला 39 डावांपैकी केवळ 6 डावात पूर्ण 50 ओव्हर्स खेळता आल्या आहेत. तर गेल्या 13 एकदिवसीय मालिकेपैकी 9 मालिका त्यांनी गमावल्या आहेत. त्यामुळे वनडेतला हा खराब रेकॉर्ड टीम इंडियासाठी फायद्याचा आहे. वनडेशी संघर्ष करत असलेल्या या संघाविरूद्ध भारताला सहज विजय मिळवता येणार आहे.
दरम्यान टीम इंडियासमोर वेस्ट इंडिजची ही बाजू कमजोर ठरते की ताकदवान, हे या मालिकेतच कळणार आहे.