Ind vs Lanka : श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर अर्शदीप सिंहवर भडकले प्रेक्षक, केला गंभीर आरोप

भारत आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात अर्शदीप सिंहच्या नावावर नकोसा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा Team India चा पहिलाच गोलंदाज

Updated: Jan 6, 2023, 02:13 PM IST
Ind vs Lanka : श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर अर्शदीप सिंहवर भडकले प्रेक्षक, केला गंभीर आरोप title=

India vs Sri Lanka 2nd T20 : :भारत आणि श्रीलंकेदरम्यान पुण्यात काल दुसरा टी20 सामना खेळवण्यात आला. या सामन्यात श्रीलंकेने भारताचा पराभव करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. श्रीलंकेने पहिली फलंदाजी करताना भारतीय बॉलर्सची अक्षरश: पिसं काढली. लंकेच्या फलंदाजांनी भारतासमोर (Team India) विजयसाठी तब्बल 206 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताच्या प्रत्येक गोलंदाजाने खोऱ्याने धावा दिल्या. पण यातही संघाचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) नकोसा रेकॉर्ड या सामन्यात केला. यामुळे प्रेक्षकही  भडकले असून गंभीर आरोप केले जात आहेत. 

अर्शदीप सिंहच्या नावावर नकोसा रेकॉर्ड
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने टॉस जिंकला आणि पहिली गोलंदाजी (Bowling) करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाने दोन बदल केले. दुखापतग्रस्त संजू सॅमसनच्या (Sanju Samson) जागी राहुल त्रिपाठीला (Rahul Tripathi) संधी देण्यात आली तर हर्षल पटेलऐवजी (Harshal Patel) अर्शदीपला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये जागा मिळाली. व्हायरल फिवरमधून बरं होऊन अर्शदीपने टीम इंडियात पुनरागम केलं खरं, पण हे पुनरागमन त्याच्यासाठी फारसं चांगलं ठरलं नाही. आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये अर्शदीपने सलग तीन नो बॉल (No Ball) टाकले. विशेष म्हणजे अर्शदीपने या सामन्यात चक्क पाच नो बॉल टाकले. 

अशी कामगिरी करणारा भारताचा पहिला गोलंदाज
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (T20 International Cricket) नो बॉल टाकणारा अर्शदीप सिंग भारताच पहिला तर जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी न्यूझीलंडचा गोलंदाज हॅमिश रुदरफोर्डने एका टी20 सामन्यात 5 नो बॉल टाकले होते. लंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी एकूण 7 नोबॉल टाकले, यावर 22 धावा घेण्यात आल्या. या नकोशा कामगिरीबद्दल बोलताना कर्णधार हार्दिक पांड्याने चिंता व्यक्त केली. साध्या चूका टाळायला हव्यात असं हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) म्हटलंय.

अर्शदीपवर गंभीर आरोप
अर्शदीपने सामन्यात पाच नो बॉल टाकल्यानंर ट्विटरवर त्याच्याविरुद्ध प्रतिक्रिया उमटू लागल्या, काही प्रेक्षकांनी अर्शदीपची तुलना पाकिस्तानचा वेगवान बॉलर मोहम्मद आमिरशी केली. काही प्रेक्षकांनी अर्शदीपला भारताचा मोहम्मद आमिर (Mohammad Amir) असं म्हटलंय. धक्कादायक म्हणजे काही प्रेक्षकांनी त्याच्यावर मॅच फिक्सिंगचाही आरोप केला आहे. या आधी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात झेल सोडल्यानंतर अर्शदीपवर खलिस्तानी (khalistani) असल्याचा आरोप करण्यात आला होता.

अर्शदीप सिंहच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14 नोबॉल जमा झाले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक नो बॉलचा रेकॉर्ड त्याने केलाय.