चर्चा अर्जुन तेंडुलकरची पण हिरो विदर्भाचा अथर्व तायडे!

भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेली अंडर १९ यूथ टेस्ट सीरिज चर्चेत आहे. 

Updated: Jul 25, 2018, 06:29 PM IST
चर्चा अर्जुन तेंडुलकरची पण हिरो विदर्भाचा अथर्व तायडे! title=

कोलंबो : भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेली अंडर १९ यूथ टेस्ट सीरिज चर्चेत आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनं या सीरिजमधून क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यामुळे या सीरिजला महत्त्व प्राप्त झालं. या सीरिजच्या पहिल्या मॅचमध्ये अर्जुन तेंडुलकरला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. ऑल राऊंडर म्हणून अर्जुन तेंडुलकरला संधी मिळाली होती. पण पहिले बॉलिंग करताना अर्जुननं ११ ओव्हरमध्ये एक विकेट घेतली. अर्जुननं त्याच्या दुसऱ्या ओव्हच्या शेवटच्या बॉलला कमील मिशाराला एलबीडब्ल्यू आऊट केलं. तर बॅटिंग करताना अर्जुन तेंडुलकर शून्य रनवर आऊट झाला.

या सीरिजमध्ये अर्जुन तेंडुलकरची चर्चा सुरु असली तरी खरा हिरो ठरला अकोल्याचा अथर्व तायडे. दुसऱ्या टेस्टमध्ये अथर्व तायडेनं १७७ रनची खेळी केली. ओपनर असलेल्या अथर्वनं १७२ बॉल खेळले. यामध्ये २० फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता. ८९ बॉलमध्ये अथर्वनं शतक पूर्ण केलं.

कोलंबोमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्येही अथर्वनं १६० बॉलमध्ये ११३ रन केले. याचबरोबर अंडर-१९ मध्ये लागोपाठ दोन शतकं करणारा अथर्व पाचवा खेळाडू ठरला आहे. याआधी विनायक मानेनं इंग्लंडविरुद्ध २००१ साली, पियुष चावलानं २००६-०७ साली, अभिनव मुकुंदनं श्रीलंकेविरुद्ध आणि विजय झोलनं २०१३ साली लागोपाठ दोन टेस्टमध्ये शतकं केली होती.

८९ बॉलमध्ये शतक करणारा अथर्व तायडे सर्वात जलद शतक करणाऱ्या युवा खेळाडूंमध्ये दुसरा ठरला आहे. मोईन अलीच्या नावावर हा रेकॉर्ड आहे. लीड्समध्ये श्रीलंकेविरुद्ध मोईन अलीनं ५६ बॉलमध्ये शतक केलं होतं. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारतानं शानदार प्रदर्शन करत श्रीलंकेला इनिंग आणि २१ रननी हरवलं.