मुंबई : भारत- दक्षिण आफ्रिकेतील (Ind vs SA) पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज 9 जून रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार KL राहुल आणि गोलंदाज कुलदीप यादव दुखापतीमुळे मालिकेबाहेर पडलाय. त्यामुळे कर्णधार पद ऋषभ पंतकडे (rishabh pant) आले आहे. त्यातच भारताकडून नेमकी ओपनिंगला कोणती जोडी उतरणार ? टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन नेमकी कशी असणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भारत- दक्षिण आफ्रिकेत पहिला T20 सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता रंगणार आहे. केएल राहुलच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत भारतीय संघाचे नेतृत्व करेल. तर दुसरीकडे, टेंबा बावुमा दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व करणार आहे.
आयसीसी टी-20 क्रमवारीत भारत सध्या पहिल्या क्रमांकावर आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. सलग 12 टी-20 सामने जिंकून भारतीय संघ विजयाच्या रथावर आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या पाच टी-20 पैकी चार सामने जिंकले.
'ही' जोडी सलामीला उतरणार
केएल राहुल (kl rahul) दुखापतीमुळे मालिकेबाहेर पडलाय.त्यामुळे सलामीला नेमकं कोण उतरणार हा मोठा प्रश्न बनला होता ? त्यात आता ऋतुराज गायकवाडला पहिल्या टी-20मध्ये ईशान किशनसोबत सलामीची संधी मिळू शकते. तर प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचं झालं तर दिनेश कार्तिकलाही संधी दिली जाऊ शकते. तसेच या सामन्यात सर्वांच्या नजरा उमरान मलिककडे असणार आहेत. हा वेगवान गोलंदाज पदार्पण करतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
आतापर्यंत कोणत्या संघाचं वर्चस्व
भारताने दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व राखले आहे. या फॉरमॅटमध्ये भारताने आतापर्यंत एकमेकांविरुद्ध 15 सामने खेळले आहेत. यादरम्यान टीम इंडियाने नऊ, तर दक्षिण आफ्रिकेने सहा सामने जिंकले. यावेळी दोन्ही संघांमध्ये रोमांचक मालिका अपेक्षित आहे. मात्र, केएल राहुल, विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह या खेळाडूंची अनुपस्थिती टीम इंडियाला त्रास देऊ शकते.
टीम इंडिया प्लेइंग XI
ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (C/W), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, उमरान मलिक.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग XI
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, रस्सी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम, टेम्बा बावुमा (क), डेव्हिड मिलर, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, केशव महाराज, तबरीझ शम्सी, एनरिक नॉर्किया.