नवी दिल्ली : भारतीय महिला संघाची सर्वोत्तम फलंदाज मिताली राजने बुधवारी सर्वांनाच धक्का देत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली. मितालीने एका ट्विटद्वारे ही घोषणा केली. तेव्हापासून सोशल मीडियावर तिला पुढील आयुष्याच्या शुभेच्छा आणि देशाच्या क्रीडाविश्वासाठी दिलेल्या योगदानाबद्दल लोकं आभार व्यक्त करीत आहेत. यादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूच्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
तिच्या निवृत्तीची घोषणा करताना, मिलतीने तिच्या एका ट्विटमध्ये लिहिले, 'मला वाटते की माझ्या करिअरला अलविदा करण्याची हीच योग्य वेळ आहे. कारण सध्या संघ अतिशय प्रतिभावान युवा खेळाडूंच्या हाती आहे आणि भारतीय क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल आहे. मितालीने निवृत्ती जाहीर केल्यापासून लोक तिला अनेक शुभेच्छा देत आहेत.
मितालीसोबतचा तिचा एक फोटो शेअर करताना, तापसीने त्यासोबत एक भावनिक पोस्टही लिहिली आहे. त्यात तापसीने लिहिले की, 'भारतीय क्रिकेट संघासाठी एकदिवसीय सामन्याचे नेतृत्व करणारी सर्वात तरुण महिला क्रिकेटर. ४ विश्वचषक स्पर्धेत संघाचे नेतृत्व करणारी आणि दोनदा अंतिम फेरी गाठणारी एकमेव भारतीय क्रिकेटपटू!
तसेच, कसोटी सामन्यात 200 धावा करणारी, पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारी, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग 7 वेळा 50 धावा करणारी एकमेव भारतीय क्रिकेटपटू.!
तापसीने या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, 'काही व्यक्तिमत्त्वे आणि त्यांची कामगिरी जेंडर एग्नोस्टिक आहेत. तुम्ही पूर्ण खेळच बदलला, आता आमचा दृष्टिकोन बदलण्याची वेळ आहे. कर्णधार मिताली राज आता आयुष्याच्या पुढच्या वळणावर आहे.
तापसी लवकरच मिताली राजच्या बायोपिक 'शाबाश मिठू'मध्ये तिची भूमिका साकारताना दिसणार आहे. सृजित मुखर्जी दिग्दर्शित, या चित्रपटात मितालीचा वयाच्या 8 व्या वर्षापासून ते तिच्या स्वप्नांच्या पूर्ततेपर्यंतचा प्रवास पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट यावर्षी 15 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की मिताली ही केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा आणि सर्वाधिक काळ कर्णधारपदाचा विक्रमही तिच्या नावावर आहे.