दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याच्या हेतूने पोहोचलेल्या भारतीय संघाला पहिल्या सामन्यातच लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताला पहिल्या सामन्यात तीन दिवसातच एक डाव आणि 32 धावांनी पराभव स्विकारावा लागला. या पराभवासह भारतीय संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 0-1 असा पिछाडीवर आहे. त्यामुळे भारतीय संघाने पुढील कसोटी सामना जिंकला तरी बरोबरीत समाधान मानावं लागणार असून, मालिका जिंकण्याचं स्वप्न अधुरंच राहणार आहे.
या सामन्यात गोलंदाजांमध्ये फक्त जसप्रीत बुमराहने प्रभावी कामगिरी केली. इतर गोलंदाज मात्र चांगली कामगिरी करण्यात अपय़शी ठरले. रोहित शर्माने सामन्यानंतर म्हटलं की, "ही 400 धावा उभारु शकणारी खेळपट्टी नव्हती. आम्ही फार धावा दिल्या. आम्ही प्रत्येक ठिकाणी चेंडू टाकल्यानंतरही असं झालं. तुम्ही फक्त एका गोलंदाजावर (बुमराह) अवलंबून राहू शकत नाही. इतर तीन गोलंदाजांनी आपली भूमिका नीट निभावण्याची गरज आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांकडून आम्ही खूप काही शिकू शकतो".
गोलंदाजांकडून पूर्ण प्रयत्न झाले हे मान्य करताना रोहित शर्माने बुमराह एकटाच फलंदाजांवर दबाव आणू शकत नाही असंही म्हटलं. "बुमराहने फार चांगली गोलंदाजी केली. आपल्या सर्वांनाच तो किती उत्तम फलंदाज आहे याची जाणीव आहे. पण हे होत असतं. तिघांनीही फार प्रयत्न केले. पण आम्हाला हवं होतं तसे निकाल मिळाले नाहीत. पण असे सामने तुम्हाला खूप काही शिकवतात. जसं की गोलंदाजीत तुम्ही काय सुधारणा करु शकता," असं रोहित म्हणाला.
प्रसिद्ध कृष्णा याच्याकडे फक्त 12 प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव आहे. त्याने पदार्पणातील पहिल्याच सामन्यात 20 ओव्हर्समध्ये 93 धावा दिल्या. रोहित शर्माने प्रसिद्धला अनुभव नसल्याचं मान्य करताना, संघ त्याच्यावर यापुढेही विश्वास दाखवणार असल्याचं म्हटलं आहे.
"तो नक्कीच नवखा असून, त्याच्या गाठीशी अनुभव नाही. पण त्याच्याकडे या स्तरावर खेळण्यासाठी लागणारा अनुभव आहे. जर तुम्ही आमच्याकडे उपलब्ध असणारे गोलंदाज पाहिले तर त्यातील काही जखमी असून, काहीजण उपलब्ध नाहीत. त्यामुळे आम्ही परिस्थितीच्या आधारे जे उपलब्ध आहेत त्यांची निवड करत आहोत," असं रोहित शर्मा म्हणाला.
"तो जास्त कसोटी खेळलेला नाही हे मी समजू शकतो, पण संघात आणखी तीन गोलंदाज आहेत, ज्यांनीही जास्त कसोटी खेळलेली नाही. पण त्यांना संघाला कोणत्या गोष्टींची गरज आहे हे दाखवून दिलं आहे. तुम्ही फक्त शरिराचा नाही तर डोक्याचाही वापर करायचा असतो. तुम्ही तुमच्या मेंदूचा कसा वापर करता आणि खेळात त्याचा काय फायदा होतो हे महत्त्वाचं आहे," असं रोहितने स्पष्टच सांगितंलं.
"जेव्हा तुम्हाला संधी मिळते तेव्हा तुम्ही त्यासाठी आभार मानत संघासाठी मेहनत घ्यायला हवी. त्याच्यासाठी नक्कीच हा सामना फार चांगला नव्हता. पहिल्या सामन्यात अनेकजण दबावात असतात. तोदेखील दबावात असू शकतो," असं रोहित म्हणाला. पुढे त्याने सांगितलं की, "अशा गोष्टी होत असतात. पण आमचा त्याला पाठिंबा असेल".